- शौकत शेख ।डहाणू : पालघर जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाच्या नियोजनशून्य कारभारामुळे पश्चिम किनारपट्टीवरील २९ गावे, पाड्यांतील महिलांवर पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकण्याची वेळ आली आहे. विशेष म्हणजे पालघर जिल्हयातील डहाणू, पालघर, तलासरी, विक्रमगड या तालुक्यांसाठी सिंचन आणि पिण्याच्या पाण्यासाठी बांधलेल्या सूर्या प्रकल्पाचे पाणी मिरा-भार्इंदर आणि वसई-विरार या शहरी भागांकडे वळविले जात असतांना स्थानिक भूमीपुत्रांना पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांत कमालीचा असंतोष निर्माण झाला असून किनारपट्टीवरील ग्रामस्थांंनी पंचायत समितीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.डहाणूच्या बंदरपट्टी भागांतील लोकांना पिण्याचे पाणी मिळावे या हेतूने माजी आमदार शंकर नम यांच्या प्रयत्नाने सन १९८९ ला बाडापोखरण प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली होती. या योजनेला साखरे धरणातून पाणी पुरवठा केला जातो. परंतु सन २००६ ला बाडापोखरण योजनेची जलवाहिनी, जलकुंभ, जीर्ण व जुनाट झाल्याने काँग्रेसचे माजी आदिवासी विकास राज्यमंत्री राजेंद्र गावित यांच्या प्रयत्नाने त्यावेळी काँग्रेसच्या सरकारने बाडापोखरण पाणी पुरवठा योजनेच्या नूतनीकरणासाठी ४३ कोटी ३९ लाख रूपये मंजूर केले.त्यानंतर येथील सुमारे ८५ किमीची जलवाहिनी बदलण्याचा कामाबरोबरोच ठिकठिकाणी नवीन जलकुंभ बांधण्यात आले. नूतनीकरणाचे काम सप्टेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार होते.परंतु ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे सहा महिने मुदतवाढ देऊनही काम पूर्ण झाले नसल्याने पाण्यासाठी ग्रामस्थांचे हाल होत आहेत.दरम्यान साखरे धरणाजवळ बाडापोखरण पाणीपुरवठा योजनेचा मोठा जलकुंभ आहे. या धरणातून पाणी त्यात चढवून त्यांचे शुध्दीकरण करून नंतर वाणगांव, चिंचणी, तारापूर, डहाणू, ओसार, तणासी, वाढवण इ. २९ गावांना तसेच परिसरातील खेडोपाडयांना नळाव्दारे ते पुरविले जाते. येथील नागरिकांना दुषित पाणी पिण्याची वेळ आली आहे. दरम्यान बंदरपट्टी भागांत गेल्या आठ दिवसापसून पाणी सोडले जात असल्याने रहिवाशांचे त्यातही महिलांचे अत्यंत हाल सातत्याने होत आहेत.जनरेटरची गरजमहावितरणचा साखरे फिडर नेहमीच बे्रकडाऊन असल्याने तिथे जिल्हा परिषदेने जनरेटर बसविण्याची गरज आहे. परंतु प्रशासन केवळ पाणीपट्टी वसूलीचा एक कलमी कार्यक्रम राबवित असल्याने घराघरातील नळांना पाणी नाही. परंतु लोकांच्या डोळयात पाणी आले आहे. कारण गेले अनेक महिने या योजनेतून आठ आठ, पंधरा, दिवसाने एकदा पाणी पुरवठा केला जात आहे.
बाडापोखरण पाणीयोजनेचा बोजवारा; जि.प.ची निष्क्रियता, भूमिपुत्र तहानलेले, पाणी मात्र इतर तालुक्यांना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 3:58 AM