मंगेश कराळे
नालासोपारा - विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या नंतर बविआने रविवारी संध्याकाळी विरार येथे कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. यावेळी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी ही मोठी घोषणा केली. कार्यकर्त्यांनी हितेंद्र ठाकूर यांचे भाषण मधेच थांबवून वसई विधानसभा मतदार संघातून त्यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करावी असा आग्रह केला. माझा कार्यकर्ता हीच माझी मोठी ताकद आहे म्हणणाऱ्या ठाकुरांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन स्वतःची उमेदवारी जाहीर केल्यांनतर कार्यकर्त्यांमध्ये एकच जल्लोष झाल्याचं यावेळी दिसून आले. पालघर जिल्ह्यातील सहाही मतदार संघातून आपण निवडणूक लढवणार असल्याचं यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी जाहीर केलं. मोठ्या संख्येने बविआचा विजय होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त करत कार्यकर्त्यांना जोमाने कामाला लागण्याच्या सूचना केल्या.
राजीव पाटील माझ्या संपर्कात, आम्ही सगळे कामाला लागले आहोत. गेल्या काही दिवसांपासून बविआमध्ये राजीव पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे अस्वस्थता होती यावर हितेंद्र ठाकूर काय भाष्य करतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते. स्वप्न विरोधी पक्षांना पडली होती पण राजीव पाटील हे माझ्या संपर्कात असून आम्ही सगळे कामाला लागले आहोत असे ठाकुरांनी सांगितले. राजीव पाटील पूर्वनियोजित कामामुळे बाहेर असल्याचे त्यांनी सांगितले व यावरून राजकारण करू नये असेही ते यावेळी म्हणाले.
आमची नावं कधीच खोक्यात आली नाही.
फुटाफुटीचं राजकारण महाराष्ट्रात सुरु असताना आमची नावं कधीच खोक्यात आली नाहीत असा टोलाही त्यांनी विरोधकांना यावेळी लगावला. माझ्यासह आपल्या दोन आमदारांना कधीही अशा प्रकारच्या राजकारणात आपण कधी पडलो नाहीत आणि पडणार नाहीत असेही ते म्हणाले. आमचा बविआ हा पक्ष कायमच विकासाचा मुद्दा घेऊनच राजकारणात काम करतो त्यामुळे आम्ही विकास कामांवरच बोलणार असे ठाकुरांनी सांगितले. या मेळाव्यात अनेक ज्येष्ठ नेत्यांसह अनेक कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या, तरुण कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते. नायगाव, नालासोपारा आणि आचोळे येथील अनेक कार्यकर्त्यांनी यावेळी बविआत जाहीर प्रवेश केला.