वसई : बँकींग क्षेत्रात सध्या प्रचंड स्पर्धा सुरु आहे. तरूण पिढी डिजीटल बँकींगचा वापर करीत आहे. आॅनलाईन बिझनेस वाढत आहे. आजपर्यंत बँकांमध्ये लोक येते होते. यापुढे बँकांना लोकांकडे जावे लागणार आहे, असे प्रतिपादन रिझर्व्ह बँकेच्या संचालिका सुरेखा मरांडी यांनी वसईत बॅसीन कॅथॉलिक बँकेच्या शताब्दी महोत्सव कार्य्क्रमात बोलताना व्यक्त केले.कॅथॉलिक बँकेच्या शताब्दी वर्षानिमित्ताने वसईत एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मरांडी बोलत होत्या. अध्यक्षस्थानी आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो होते. तर महापौर प्रविण ठाकूर, बँकेचे अध्यक्ष मायकल फुर्ट्याडो व्यासपीठावर होते. बँकेच्या नव्या बोधचिन्हाचे उद्घाटन आर्चबिशप मच्याडो यांच्या हस्ते करण्यात आले. थीम साँगचे अनावरण महापौर प्रविणा ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. बँकेच्या व्हिजन मिशनचे प्रकाशन मरांडी आणि दिनदर्शिकेचे प्रकाशन मायकल फुर्ट्याडो यांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी १८७५ साली कर्ज मुक्तीसाठी आंदोलन केले होते. त्यानंतर १९०४ साली को-आॅप अॅक्ट अस्तित्वात येऊन त्याची अंमलबजावणी १९१२ साली झाली. बॅसीन कॅथॉलिक पतपेढी ६ फेब्रुवारी १९१८ साली स्थापन झाली. नंतर तिचे बँकेत रुपांतर झाले. हे कालसुसंगतच आहे. १९६६ साली रिझर्व्ह बँकेने सहकारी बँकांच्या सुपरव्हिजनला सुरुवात केली. त्याचवेळी कॅथॉलिकला क्रेडीट सोसायटीचा दर्जा मिळाला होता. ही गोष्ट सूचक आहे. सहकारी बँकांमध्ये घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने महाराष्ट्रातील अनेक सहकारी बँकांमध्ये भ्रष्टाचार होऊन बँका बंद पडल्या. मात्र, कॅथॉलिक बँकेने आपले व्यवहार चोख ठेवत सहकार क्षेत्रात एक आदर्श ठेवला आहे, असेही मरांडी यांनी आपल्या भाषणात सांगितले.गरजवंतांना राष्ट्रीयकृत बँकांपेक्षा सहकारी बँका जवळच्या वाटतात. त्यासाठी सरकारने सहकारी बँका मजबूत केल्या पाहिजेत, असे मत महापौर प्रविण ठाकूर यांनी यावेळी बोलताना व्यक्त केले. बँकेचे आद्य संस्थापक मॉन्सी. पी. जे. मोनीस यांनी आपल्यावर जे संस्कार केले, त्यानुसार आम्ही पुढे जात आहोत. समाजातील आर्थिकदृष्टया शेवटचा घटक असलेल्यांची सेवा करणे हे आमचे उद्दीष्ट आहे, असे प्रतिपादन बँकेचे चेअरमन मायकल फुर्ट्याडो यांनी यावेळी बोलताना केले.देशावरून, भाषेवरून ख्रिस्ती माणूस ओळखला जात नाही. ख्रिस्ती माणसे सेवाव्रताने ओळखली जातात. यात धारणेतून गेली शंभर वर्षे बँक समाजाला योगदान देत आहे, असे आर्चबिशप मच्याडो यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. बँकेच्या महाव्यवस्थापिका ब्रिजदिना कुटीनो यांनी प्रास्ताविकात ही बँक वसईतील सहकार चळवळीतील अग्रणी असून शेतकरी बागायतदारांची आर्थिक शोषणातून, कर्जबाजारीतून तिने मुक्तता केल्याचे सांगून बँकेच्या प्रगतीचा आढावा घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश सावे यांनी केले. तर मॅक्सवेल यांच्या पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली.
‘यापुढे बँकांनाच लोकांकडे जावे लागेल’ - सुरेखा मरांडी
By admin | Published: March 16, 2017 2:40 AM