पारोळ : अलिबाग येथील वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी दोषी असलेल्या रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी नुकतीच अटक केली आहे. याप्रकरणी अर्णव गोस्वामी अटकेवरून विविध क्रिया-प्रतिक्रियांना उधाण आले आहे. ही कारवाई आकसापोटी केली जात असल्याचा आरोप महाराष्ट्रातील राजकीय विरोधकांकडून केला जात आहे, तर लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करणाऱ्या अर्णव गोस्वामी आणि त्यांच्या रिपब्लिक टीव्हीविरोधात पोलिसांनी उचित कारवाई केली पाहिजे, अशा प्रतिक्रिया सोशल मीडिया आणि समाजस्तरावरून उमटत आहेत.
दरम्यान, अर्णव गोस्वामी यांना रायगड पोलिसांनी केलेल्या अटकेनंतर अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाई झालीच पाहिजे, अशी मागणी करत वसई शहर शिवसैनिकांनी वसई पश्चिमेतील ओमनगर या ठिकाणी ‘जस्टीस फॉर अन्वय नाईक’ अशी बॅनरबाजी करत अर्णव गोस्वामी यांना झालेल्या अटकेचे समर्थन केले आहे.
महाराष्ट्र शासन आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात सातत्याने अर्णव गोस्वामी यांनी आरोप-प्रत्यारोपांची मालिकाच सुरू केली होती. प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येप्रकरणी मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याबरोबरच त्यांच्यावर नाना तऱ्हेचे आरोप करण्याचा सपाटाच अर्णव गोस्वामी यांनी लावला होता. अशात टीआरपी घोटाळ्यात अर्णव गोस्वामी यांचे धागेदोरे पोलिसांच्या हाती लागल्याने अर्णव गोस्वामी यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्या आत्महत्येप्रकरणी रायगड पोलिसांनी अर्णव गोस्वामी यांना अटक केली.