पालघर : पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना दोन गटात बॅनर वॉर उफाळले आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे गट) आणि शिवसेना (शिंदे गट) चे कार्यकर्ते,पदाधिकारी आमने-सामने आले. यावेळी दोन्ही गटांच्या उमेदवारांचे बॅनर फाडले जात असल्याने वातावरण तापले असताना बोईसर पोलिसांनी हे प्रकरण वेळीच नियंत्रणात आणले.
पालघर जिल्ह्यातील बोईसर विधानसभा मतदारसंघात शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस चिघळत आहे. बोईसर शहरात शिवसेना उबाठाचे उमेदवार विश्वास वळवी आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे यांचे बॅनर लावलेले होते. मात्र, या बॅनर फाडण्याच्या घटनेमुळे परिसरात तणाव निर्माण झाला आहे.सध्या बोईसर मध्ये शिवसेना आणि भाजप पदाधिकारी मध्ये एकवाक्यता होत नसल्याने अजूनही भाजप प्रचारात सक्रिय झाला नसल्याचे दिसून येत आहे.
आज दुपारी बोईसर सिडको परिसरात हे बॅनर फाडण्यात आले असून, या घटनेमुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष पसरला आहे. शिवसेना (उबाठा) आणि शिवसेना (शिंदे गट) या दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असताना पोलिसांनी हस्तक्षेप करून प्रकरण शांत केले.
काही कार्यकर्त्यांनी या घटनेमागे राजकीय द्वेष असल्याचा आरोप केला आहे, तर काही कार्यकर्त्यांनी हा प्रकार पक्षाच्या गटांतर्गत स्पर्धेचा परिणाम असल्याचे म्हटले आहे.
या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यामुळे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांत हा संघर्ष वाढण्याची शक्यता आहे.