आशिष राणे
वसई - बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ वकील ऍड. गजानन चव्हाण व बार कौन्सिलचे उपाध्यक्ष ऍड. संग्राम देसाई यांचा शुक्रवार 24 सप्टेंबर रोजी वसईत सत्कार करण्यात येणार आहे. वसईतील संत गोंसालो गार्सिया महाविद्यालयाच्या सभागृहात सायंकाळी 5.30 ते 7.30 या वेळेत संपन्न होत असून सदर कार्यक्रमाचे आयोजन वसईतील चारही वकील संघटनांनी संयुक्तपणे केल्याची माहिती ऍड -जॉर्ज फर्गोस यांनी लोकमतला दिली आहे.
एकुणच ठाणे सत्र न्यायालयातील जेष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अंण्ड गोवाच्या निवडणुकीत विक्रमी मतांनी विजय संपादन केला होता. अत्यंत ऋजुतापूर्ण ऍड. गजानन चव्हाण यांचा समकालीन वकील सहकारी व युवा वकील सहकारी वर्गाशी स्नेहशील संवाद राहिला आहे. त्यामुळे, नव्या वकिलांची पिढी घडविणारे ऍड. गजानन चव्हाण वकील वर्गात अत्यंत लोकप्रिय राहिले आहेत. दरम्यान, वसई न्यायालयातील वकिलांच्या चारही संघटनामध्ये विविध बाबतीत मतभिन्नता असली तरी ऍड चव्हाण यांच्यासंदर्भात चारही वकील संघटनांमध्ये त्यांच्याबाबत एकमत आहे. तर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड गोवा निवडणुकीत वसई न्यायालयातील बहुतांश वकिलांनी ऍडव्होकेट गजानन चव्हाण यांना भरभरून पहिल्या पसंतीची मते दिली होती.
ऍड चव्हाण ओजस प्रेरणास्त्रोत - देसाई
अत्यंत उर्जावान व उत्तम मार्गदर्शक व दिशादर्शक म्हणून असलेले ऍड. गजानन चव्हाण हे आमच्यासाठी एक ओजस प्रेरणास्त्रोत असल्याचे वसईतील जेष्ठ फौजदारी वकील ऍड. दिगंबर देसाई यांनी म्हंटलं आहे. किंबहुना वकिली व्यवसायात त्यांच्याकडून आपण बऱ्याच गोष्टी आत्मसात केल्या तथा त्यांनी वकिलांच्या पिढ्या घडविण्याचे उत्तम कार्य केल्याचे ऍड. दिगंबर देसाई यांनी लोकमतला सांगितले. अर्थातच ज्येष्ठत्वाचं ओझं न वागवता सर्वच सहकार्यांमध्ये मिळून मिसळून वागण्याची एक आगळी संवादशील हातोटी ऍड.चव्हाण यांच्या अभिव्यक्तीत असून तेच त्यांच्या लोकप्रियतेचे खरे गमक असल्याचं ऍड.दिगंबर देसाई यांनी यावेळी म्हटलं.