- लोकमत न्यूज नेटवर्क
मीरा रोड - काशीमीरा नाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळा लगत असलेला बारवाला रात्रीच्या वेळी रस्त्यावरील सार्वजनिक पथदिवा स्वतःच्या धंद्या साठी बंद करत असल्याचा प्रकार गुरुवारी रात्री शिवभक्तांनी उघडकीस आणला आहे . या प्रकरणी गुन्हा दाखल करून बारवर कारवाईची मागणी केली आहे.
काशीमीरा नाका येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा आहे. शहराचं प्रवेशद्वार असलेल्या या परिसराला छत्रपती शिवाजी महाराज चौक असे नामकरण पालिकेने केले आहे. या पुतळ्या मागे महापालिकेने हायमास्टचे दिवे लावलेले आहेत. तसेच पुतळ्या लगत मुख्य रस्त्यावर पालिकेचे पथदिवे आहेत.
परंतु अनेक वेळा हायमास्ट दिवे बंद केले जात होते. तसेच याठिकाणी असलेल्या सारंग आणि राम पंजाब बार बाहेर रस्त्यावर असलेला पथ दिवा रात्रीच्या वेळी बंद केला जात होता. यामुळे महाराजांचा पुतळा व परिसर अंधारात असायचा.
मुख्य चौक व शहराचे प्रवेशद्वार असल्याने या ठिकाणी दिवस-रात्र वाहनांची वर्दळ असते. लोकांचा राबता असतो. परंतु सदर बार चालक सार्वजनिक पथदिवा रात्री उशिरा बंद करून ग्राहकांना मध्य व खाद्यपदार्थ पार्सल देतो. बाहेरच्या बाजूला सुद्धा मद्यपान करून बाटल्या आदी पुतळ्याच्या चौकात टाकल्या जातात. बारच्या प्रवेशद्वारावर व बारच्या आत मध्ये लोक दिसू नये यासाठी हा पथदिवा बंद केला जात असल्याच्या तक्रारी शिवभक्तांनी चालवल्या होत्या.
गुरुवारी रात्री उशिरा बार लगतचा पथदिवा बंद केला गेल्याने चांगलाच काळोख पडला होता. त्या काळोखात बार मात्र खुला ठेवून पार्सल आदि दिले जात होते. प्रदिप सामंत, सचिन घरत, रवींद्र भोसले, पवन घरत आदींनी
पथदिवा बंद असल्याचे पाहून त्याचा स्विच बोर्ड तपासला असता दिव्याचे बटन बंद केलेले आढळले. स्वतःच्या गैरधंद्यासाठी महाराजांच्या पुतळ्या जवळील सार्वजनिक पथदिवे बंद करणाऱ्या बारवाल्यावर गुन्हा दाखल करून बारचे सर्व परवाने रद्द करावेत. बार कायमचा बंद करण्याची मागणी केली आहे.