विक्रमगड : या तालुक्यातील आदिवासी गाव-पाडयांना जोडणाऱ्या साखरे गावातील देहेर्जे नदीवर असलेल्या पुलाच्या पुर्नबांधणीत मातीमिश्रित रेतीचा वापर होत असल्याने त्याच्या मजबुतीबाबतच शंका निर्माण झाली आहे. दुरावस्था झाल्याने त्याच्या पुर्नबांधणीची मागणी करण्यात आली होेती़ त्यानंतर ३१आॅक्टोंबर २०१५ रोजी आदिवासी विकास मंत्री विष्णू सवरा यांनी भूमीपूजन करुन देखील त्याचे काम रखडले होते़ याबाबतचे वृत्त लोकमतने प्रसिध्द करुन पाठपुरावा केला होता व अखेर त्याची दखल घेऊन शासनाने गेल्या एक महिनाभरापूर्वी या पूलाची पुर्नबांधणी करण्यास सुरुवात केली आहे़ हे काम आऱ के़ सावंत शहापूर यांना देण्यात आले आहे. सध्या पुलाच्या पायाचे काम चालू आहे, मात्र यामध्ये कामामध्ये वापरण्यात येणारी रेती ही निकृष्ट दर्जाची व ७५ टक्के माती मिश्रीत असल्याने साखरे पुलाचे भवितव्य धोक्यात आले आहे.पत्रकारांनी रविवारी भेट दिली असतां मजूरांवर सारे काम सोपविलेले होते. दर्जा नियंत्रणासाठी जबाबदार अशी एकही व्यक्ती नव्हती. मजुरांना विचारले असता दुसरी रेती मिळत नसल्याने सुरुवातीपासुन हीच रेती वापरली जात असल्याचे त्यांनी सांगीतले़ हा पुल खुप जुना इंग्रज काळातील बांधलेला असल्याने तो सध्या जिर्ण अवस्थेत व त्याचे पिलर खचु लागलेले आहेत़ तर पुलास कोणत्याही प्रकारची डागडुजी करण्यात न आल्याने त्यास मोठा तडा गेलेला असल्याने हा पूल शेवटच्या घटका मोजतो आहे़ १५-२० वर्षापासुन या पुलाची मागणी होत असल्याने या पुलास अर्थ संकलपामध्ये २ कोटी रुपयांची मंजुरी मिळाली आहे़ दिड वर्षामध्ये हा पूल पूर्ण होणार आहे़ त्याची उंची ३ ते ४ मीटर असल्याने भविष्यांमध्ये कोणताही अडथळा येणार नाही़ अशी माहीती तत्कालिन अभियंता पालवे यांनी त्यावेळेस दिली होती़ देहेर्जे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर या धरणातील पाणीसाठयामध्ये या पुलाचे पिलर राहाणार असल्याने त्यांचे काम हे सुरुवातीपासूनच मजबूत होणे आवश्यक आहे़ (वार्ताहर)
साखरे पुलाचा पाया मातकट रेतीने
By admin | Published: February 14, 2017 2:38 AM