जव्हार : सहानुभूतीच्या लाटेवर बिनविरोधही होईल इथ पर्यंत शक्यता वर्तविण्यात येत असलेली पालघर लोकसभा पोटनिवडणुक आज घडीला प्रचंड अटीतटीची व रंगतदार बनत चालली आहे. भाजपाचे दिवंगत खासदार चिंतामण वणगा यांच्या सुपुत्राला शिवसेनेने पक्षात घेऊन उमेदवारी दिली अन् एरवी शांत असलेला भाजपा पक्ष चवताळला. त्यात मुख्यमंत्र्यानी जातीने लक्ष घातल्याने संपूर्ण देशाचे लक्ष या पोटनिवडणुकी कडे लागले आहे. सेना भाजपाने ही निवडणूक जिंकण्यासाठी वाट्टेल ते करण्याचीच जणू तयारी केल्याचे चित्र आहे.भाजपाने बहुजन विकास आघाडीच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या फोडाफोडी नंतर श्रमजीवी संघटनेचा पाठींबा मिळविला आहे. याशिवाय कोकण विकास मंचचे अध्यक्ष निलेश सांबरे यांनाही आपल्यात सामिल करुन आपली रणनिती मजबूत केली आहे. मुळात पालघर लोकसभा मतदार संघाचा विचार केल्यास बविआ सेना आणि भाजप यांच्यात तिरंगी सामना होण्याची शक्यता होती. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडणूकीत लक्ष घातल्याने त्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.एरवी भेटीसाठी आठवडाभर आधी वेळ घ्यावी लागत असलेले मुख्यमंत्री आता पालघर जिल्ह्यातील लहानातला लहान कार्यकत्यालाही अगदी सहजरीत्या भेटत आहेत. त्यात शिवसेनेकडून श्रीनिवास वनगा आपल्या वडिलांच्या नावे मताचा जोगवा मागत असल्याने भाजपाची गोची होताना दिसत आहे. त्यातच प्रचाराच्या रणधुमाळीत स्टार प्रचारक उतरत असल्याने ही रंगत आणखी वाढणार आहे.याशिवाय भाजप आणि सेनेकडून प्रचार यंत्रणा राबविताना कॉंग्रेस आणि बविआ यांचा उल्लेख न करता एकमेकांनावर जोरदार टीका होत असल्याने जिल्ह्यातील मतदारामध्ये हे दोन्हीपक्ष सोडून तिसरा पक्ष निवडणुक लढवत आहे की नाही अशी समभ्रमाची अवस्था निर्माण झाली आहे. सध्या जिल्ह्यातील दिग्गजांपासून गावपातळीवरच्या कार्यकत्यांचे जोरदार इनकमिंग भाजपात सुरू आहे. तसेच दोन दिग्गज नेत्यांना आपल्या संपर्कात आणण्यात भाजपाच्या व्युहरचनेला यश आले असून त्यांचाही प्रवेश मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत होणार असल्याची चर्चा आहे.गावित समर्थकांमुळे कॉँग्रेसला धोक्याची घंटाजव्हार :पालघर पोटनिवडणुकीचा रणसंग्राम सुरू झाला असून आता फक्त निवडून येणे या एकमेव ध्येयाने सर्वच पछाडलेले आहेत. ऐनवेळी कॉँग्रेस सोडून भाजपातून निवडणूक लढवत असलेले राजेंद्र गावीत यांच्या सोबतीला कॉंग्रेसचे कार्यकर्ते गेले नसले तरी ते कॉंग्रेसमध्ये असताना त्यांच्या गटात असलेली आजची कॉंग्रेस आतून भाजपाच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे कॉंग्रेसला अंतर्गत धोक्याची दाट शक्यता आहे. गावीत कॉंग्रेसमध्ये असताना पालघरात शिंगडा आणि गावीत असे दोन गट निर्माण झालेले होते. यामुळे आधीच खोलात असलेली कॉंग्रेस अंर्तगत कलहामुळे अधिक खोलात जात होती. अशा परीस्थितीत गावीत यांनी भाजपात प्रवेश करून उमेदवारी मिळवली असल्याने त्यांच्या जोडीला येथील कॉंग्रेस कार्यकर्ते गेले नाही हे खर असले तरी गावीतांची त्या काळची कॉंग्रेस म्हणजेच त्यांचे समर्थक म्हणून कॉग्रेसमध्ये वावर आहेत. भाजपात जाहीर प्रवेश न करताही ही मंडळी गावीत यांचे काम करण्याची शक्यता अधिक आहे. यामुळे असे झाल्यास सध्या मागे पडलेली कॉंग्रेस अजून मागे जाण्याची भिती आहे.वनगांच्या नावावर मतांचा जोगवातलासरी : शिवसेनेचे उमेदवार श्रीनिवास वनगा यांनी वडील दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या कवाडा येथील स्मृती स्थळा पासून आपल्या प्रचाराला सुरु वात केली. मतदानाची तारीख जवळ येत असली तरी कोणत्याही पक्षाचा म्हणावा तितका प्रचार अजून सुरु झालेला नाही. तरी सुद्धा भाजपा आणि शिवसेनेच्या उमेदवारांचीच चर्चा सुरु आहे. कारण दोघेही दिवंगत खासदार चिंतामण वनगा यांच्या नावावरच मताचा जोगवा मागत आहेत. श्रीनिवास आपल्या वडिलांनी केलेले कार्य जनतेसमोर मांडत आहेत तर भाजप ही पक्षाच्या माध्यमातून वनगांनी केलेल्या कार्याचा हवाला देत आह. चिंतामण वनगांच्या कुटुंबीयांनी शिवबंधन हाती बांधल्या नंतर भाजपची चांगलीच गोची झाली आहे. सद्या प्रचारात जोर नसला तरी भाजपा व शिवसेनेच्या गाड्या मात्र धूळ उडवीत रस्त्या वरून फिरत आहेत. मतदाराच्या दारात मात्र अजून कुणी पोहोचलेला दिसत नाहीत.जैन समाजातील तरु णांनी केला भाजपात प्रवेशमनोर : परिसरातील शेकडो जैन समाजाच्या कार्यकर्त्यांनी सुमित जैन, अशोक जैन व प्रकाश जैन यांच्या नेतृत्वाखाली भाजपामध्ये प्रवेश केला. पोट निवडणूकीच्या त्यांनी पुर्वाश्रमीच्या शिवसेना पक्षातून फारकत घेत त्यांनी भाजपाची कास धरली आहे. यावेळी राज्यमंत्री रविंद्र चव्हाण व आमदार नरेंद्र मेहता उपस्थित होते.
रणांगणातील साम, दाम नीती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2018 3:16 AM