पालघर : भाजपचा खासदार लादल्यामुळे शिवसेनेत असलेल्या नाराजीचा फायदा उठवण्यासाठी त्या पक्षातील तालुका स्तरावरील काही नेत्यांना गळाला लावून धक्का देण्याच्या हालचाली बहुजन विकास आघाडीने सुरू केल्या आहेत.शिवबंधन बांधत शिवसेनेचे उमेदवार म्हणून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरविलेले विद्यमान खासदार राजेंद्र गावित यांच्यासाठी काम न करण्याची भूमिका भाजप नेत्यांनी घेतली आहे. त्यातच आयात उमेदवारावर नाराज असलेल्या शिवसेनेच्या नेत्यांची बविआ नेत्यांसोबत जवळीक वाढल्याने काही नेत्यांना ‘मातोश्री’वर बोलावून समज देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.भाजपच्या ज्या उमेदवाराला नंदुरबारमध्ये पाठवा, असे दहा महिन्यांपूर्वी मतदारांना सांगितले, त्यालाच मते द्या, म्हणून गावोगावी मतदारांच्या दारी कसे जाणार, असा प्रश्न उपस्थित करत वेगवेगळ्या तालुकाध्यक्षांनी आधीच बंडाचे निशाण फडकावले आहे. त्यातील जे तालुकाध्यक्ष भरघोस मतांची बेगमी करू शकतात, अशा काहींशी बविआच्या नेत्यांनी संपर्क साधला असून तुमची मते आमच्याकडे वळवा, असे सांगण्यास सुरुवात केली आहे. त्यातील एक-दोघांना तर आमदारकीचे आश्वासन देण्यात आल्याचे समजते.वसई, विरार, नालासोपारा आणि बोईसर हा पट्टा वगळता बविआचा पाया भक्कम नाही. त्यामुळे तेथून आपल्या उमेदवाराला मते मिळविण्यासाठी त्या पक्षाने या खेळीला सुरुवात केली आहे. त्याचा बोभाटा होताच त्यातील काहींना मुंबईला बोलावून समज देण्यात आली. त्यानंतरही काही नेत्यांनी काम करण्यास नकार दिल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे ठाण्यातून नेते बोलावून त्यांच्याकडे प्रचाराची सूत्रे सोपविली जाण्याची शक्यता आहे.गावितांबद्दलचा असंतोषही उघडविक्रमगड तालुक्यात पालकमंत्री विष्णू सवरांबद्दल असलेला असंतोष लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उघडपणे व्यक्त होऊ लागला आहे. ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांत शिवसेना-भाजप नेते परस्परांविरोधात लढले होते, तेथे दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी परस्परांना सहकार्य न करण्याची भूमिका घेतली आहे. त्यामुळे गावागावांतील नाराज नेत्यांनी ‘पक्ष सांगेल ते करू’ अशी जाहीर भूमिका घेतली असली तरी प्रत्यक्षात काम सुरू केलेले नाही.
सेनेला धक्का देण्याच्या बविआच्या हालचाली; नाराजी उफाळल्याने समज देण्याचे प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 1:25 AM