वसई : वसई पंचायत समितीला दीर्घकाळानंतर गटविकास अधिकारी (बीडीओ) लाभला खरा, पण अवघ्या १५ दिवसांतच ते पुढील अभ्यासासाठी दीर्घकालीन रजेवर गेले. त्यामुळे पंचायत समितीचा कार्यभार पुन्हा एकदा प्रभारी अधिकाऱ्याकडे सोपवण्यात आला आहे. वसई पंचायत समितीचा कार्यभार गेल अनेक वर्षांपासून प्रभारी अधिकाऱ्याकडे होता. १५ दिवसांपूर्वी राज्य सरकारने प्राची कोल्हटकर यांची गटविकास अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती. मात्र, १५ दिवसांतच कोल्हटकर यांनी पी.एच.डी.साठी एक वर्षाची दीर्घकालीन रजा घेतली. त्यामुळे आता सहायक गटविकास अधिकारी सुरेश कांबळे यांच्याकडे कार्यभार सोपवण्यात आला आहे. यापूर्वीही कारभार प्रभारी अधिकाऱ्यांकडेच प्रदीर्घ काळ होता. या अधिकाऱ्याला मर्यादित अधिकार असल्यामुळे पुन्हा एकदा येथील विकासकामांना खीळ बसणार आहे. पंचायत समितीतील विविध प्रकरणांत गैरव्यवहाराच्या तक्रारी झालेल्या असून या पार्श्वभूमीवर येथे सक्षम अधिकाऱ्याची गरज आहे. मात्र, कोल्हटकर रजेवर गेल्याने पुन्हा एकदा समितीत कारभार रामभरोसे झाला आहे. जवाहर विहीर योजना, पारोळ प्राथमिक आरोग्य केंद्रातील अपहार याबाबत तक्रारी झाल्या आहेत. त्यांची चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. मात्र, अधिकारी व पदाधिकारी संबंधितांना पाठीशी घालण्याचे काम करत असल्याची चर्चा आहे. (वार्ताहर)
बीडीओ प्रदीर्घ रजेवर
By admin | Published: June 12, 2016 12:37 AM