आशिष राणे
माहे-एप्रिल पासून वसई-विरार महापालिकेत आयुक्त पदावर रुजू झालेले नवनियुक्त आयुक्त डी.गंगाथरन यांनी पदभार हाती घेतल्यापासून पालिका प्रशासनाच्या हिताच्या दृष्टीने काही दणकेबाज निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणीस देखील सुरुवात केली आहे. किंबहुना आयुक्तांच्या सखोल ज्ञानानुसार हे निर्णय व आदेश प्रशासकीय पातळीवर ते योग्य-अयोग्य आहेत कि नाहीत हे येत्या काळात समजेलही, मात्र राजकीय दृष्टया या निर्णयाबाबत सत्ताधारी बविआ मात्र कमालीची नाराज आहे हे सर्वश्रुत आहे.
दरम्यान प्रथम कर्मचारी- अधिकारी यांचे निलंबन,तर कुठे बडतर्फ़ तसेच सेवेतील वाहन व अतिक्रमण विभागातील वाहने व मनुष्यबळ कमी करणे असे धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे आता आयुक्तांनी आपला मोर्चा पालिकेतील त्या कामचुकार व काहीं कर्मचारी -अधिकारी वर्गाच्या केशरचना ,पोशाख ,गणवेश आणि एकूणच त्यांच्या वर्तणुकीकडे वळवला असून अशा कर्मचारी अधिकाऱ्यांनी महापालिका सेवेत कार्यालयात कोणते कपडे घालायचे, गणवेश असेल तर तो सक्तीने परिधान करणे आणि त्यात सर्वांच्या वर्तणूक सुधारणा आदी बाबत एक परिपत्रकच जारी केले आहे. इतकंच नाही तर या परिपत्रकाचे पालन न करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी वर्गावर कारवाईचा बडगा देखील पडणार असून या सर्वावर आस्थापना विभागाने नियंत्रण ठेवण्या बाबतच्या सूचना आयुक्तांनी दिल्यामुळे संपूर्ण पालिका वर्तुळात खळबळ माजली आहे.
खरंतर महापालिकेच्या सर्व अधिकारी व कर्मचारी वारांगना कार्यालयीन वेळेत शिस्तीचे पालन करणे आवश्यक असते.त्यात या सर्वांच्या गणवेश व पोषाखावरून त्यांच्या वर्तणुकीचे प्राथमिक दर्शन होत असते.नेमक्या या सर्व महत्वाच्या बाबी आयुक्तांच्या निदर्शनास आल्या व त्यांनी लागलीच पालिका अधिकारी व कर्मचारीवर्गाला याबाबत सूचना देणारे एक परिपत्रकच जारी केले.तसेच या परिपत्रकाचे तंतोतंत पालन होते कि नाही याचे हि पर्यवेक्षण करावे व तसे न झाल्यास त्या- त्या कर्मचारी व अधिकारी वर्गाचा अहवाल उचित कारवाईसाठी आस्थापना विभाग यांच्याकडे पाठवून देण्याचे हि आयुक्तांनी म्हंटले आहे.
आदेशाचे पालन करा ; अन्यथा शिस्तभंगाची कारवाई आणि ठेका रद्द !एकूणच आयुक्तांच्या या सुचने संदर्भात जर कोणी हयगय किंवा पालन केले नाही तर अशा कर्मचारी व अधिकारी वर्गावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तर ठेका अथवा कंत्राटी कर्मचाऱ्यांनी देखील उलंघन केल्यास त्या ठेका किंवा कंत्राटदाराला तात्काळ कमी केले जाईल असे हि आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.
आयुक्तांनी कुठल्या सूचना केल्या आहेत.१)प्रत्येक अधीकारी व कर्मचारी यांनी कार्यालयात येताना टी शर्ट्स ,जाकीट ,झब्बा ,विना कॉलर शर्ट्स,रंगीबेरंगी चट्टेपट्टेदार असलेले शर्ट्स.परिधान न करणे.२)गॉगल टोपी,घालून फिरू नये असे बेशिस्तपणाचे लक्षण करू नये.३)काही कर्मचारी अधिकारी हे शोभेल अशी दाढी व केश रचना ठेवत नाहीत.त्यामुळे अशांनी कार्यालयाला शोभेल अशी केश रचना व दाढी ठेवावी .४)ज्या कर्मचाऱ्यांना पालिकेने गणवेश दिले आहेत त्यांनी तात्काळ गणवेश घालूनच सेवेत उपस्थित राहायचे आहे.तसेच सर्व कर्मचारी- अधिकारी वर्गांनी आपापले गळयातील ओळखपत्र दर्शनी भागावर लावून कार्यरत राहावयाचे आहे.५)महिला कर्मचाऱ्यांनी देखील कार्यालयीन वेळेत कार्यालयास शोभेल असे पोशाख परिधान करूनच कार्यालयात उपस्थित राहावयाचे आहे.