पारोळ : वसई-विरार शहर महानगरपालिकेला जाणवणारी पाणीटंचाई या महिन्याच्या अखेरीस दूर होण्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. एमएमआरडीएच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या नव्या पाणी योजनेत वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे. या नव्या पाणीपुरवठा योजनेसाठी वसईत शुक्रवारी पाण्याचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. वसई-विरारकरांसमोर सध्या पाणीटंचाईचे विघ्न असले तरी शुक्रवारचा ब्लॉक हा वसईकरांची पाणीटंचाई दूर करणार आहे. त्यामुळे आजचा पाण्याचा ब्लॉक वसईकरांसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.
वसई-विरार शहर महानगरपालिकेस सूर्या टप्पा-१ व ३ या योजनेतून २०० द.ल.ली. प्रतिदिन पाणी उपलब्ध होत असून महानगरपालिकेस १४० द.ल.ली. पाण्याची तूट भासत आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या सूर्या प्रकल्पातून ४०३ द.ल.ली. पाणी वसई-विरार शहर महानगरपालिकेस १६५ द.ल.ली. पाण्यापैकी ८० ते ९० द.ल.ली. पाणी काशिदकोपर येथे जुलै २०२३ च्या पहिल्या आठवड्यात उपलब्ध होणार आहे. त्यामुळे वाढीव पाणी शहरात वितरित करण्याच्या दृष्टीने सूर्या योजनेतील मुख्य जलवाहिनीस काशिदकोपर शुक्रवार २३ जून रोजी जोडणीचे काम केले जाणार आहे. तरी या कामाकरिता सूर्या टप्पा-१ व टप्पा ३ या योजनेतून होणारा संपूर्ण पाणीपुरवठा २३ जून रोजी १२ ते १८ तास बंद ठेवण्यात येणार आहे. याकाळात वसई-विरार परिसरात पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांची गैरसोय होईल, मात्र हे काम नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असल्याने सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. हे जोडणीचे काम झाल्यावरही जलदा चाचणी व वॉशआऊटकरिता पुढील २ ते ३ दिवस अनियमित व अपुऱ्या दाबाने शहरास पाणी पुरवठा होणार आहे. तरी नागरिकांनी उपलब्ध पाणी जपून वापरावे, असे आवाहन पालिकेने केले आहे.
अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार सध्या संपूर्ण महाराष्ट्रावर पावसाअभावी पाण्याचे संकट आहे. वसईविरारमधील विविध धरणांमध्येही अत्यल्प पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लवकर पडला नाही तर तीव्र पाणीटंचाई शहरात जाणवू शकते, मात्र अशावेळी या नव्या पाणीपुरवठा योजनेचे काम झाले तर वसईकरांना अतिरिक्त २०० एमएलडी पाणीपुरवठा वितरित होणार आहे. त्यामुळे वसई-विरारकरांची पाण्याची तूट भरून निघण्यास मदत होणार आहे.