भार्इंदर : मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ७५ दशलक्ष पाणीपुरवठा योजनेंतर्गत नवीन नळजोडणीवाटपाचा प्रारंभ ३० एप्रिलला होत आहे. त्यात नेहमीप्रमाणे पालिकेने शिष्टाचाराला पायदळी न तुडवता त्याचे पालन करावे, असा सल्ला आमदार प्रताप सरनाईक यांनी प्रशासनाला दिला आहे. योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रकार भाजपाकडून सुरू झाला असून त्याची अपप्रवृत्ती भाजपात वाढीला लागल्याचा टोलाही त्यांनी अप्रत्यक्षपणे भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना लगावला आहे. निवडणुकीच्या तोंडावर श्रेय लाटण्याची प्रथा भाजपात वाढीला लागली आहे. इतर वेळी सेनेशिवाय भाजपाचे पानही हलत नसल्याचा टोला सरनाईक यांनी मेहता यांना लगावला. एकाच पक्षाच्या दबावाखाली प्रशासनाचा कारभार चालत राहिल्यास त्याची किंमत अधिकाऱ्यांना मोजावी लागेल. ३० एप्रिलला अतिरिक्त पाणीपुरवठा योजनेंतर्गत शहरातील नवीन नळजोडणीवाटपाचा शुभारंभ होईल. यामुळे शहरातील पाण्याची समस्या काहीअंशी मार्गी लागेल. त्यासाठी उद्योगमंत्री सुभाष देसाई व जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांचे सहकार्य मिळाले. उद्योगमंत्र्यांनी एमआयडीसी कोट्यातील ७५ दशलक्ष पाणी शहराला उपलब्ध केले असले, तरी जलसंपदामंत्र्यांनी बारवी धरणातील आरक्षित पाणीसाठा देण्यास मान्यता दिल्याने पाणीपुरवठ्याचा मार्ग सुकर झाला. यानुसार, एकाच पक्षाच्या मंत्र्याने प्रयत्न केले म्हणणे चुकीचे आहे. श्रेय लाटण्याचा सुरू असलेला एक कलमी कार्यक्रम हास्यास्पद असल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)
किमान शिष्टाचार पाळा!
By admin | Published: April 29, 2017 1:16 AM