अनिरुद्ध पाटील बोर्डी : डहाणू तालुक्यातील ३३ कि.मी.च्या नितांतसुंदर समुद्र-किनारपट्टीवर उधाणाच्या भरती लाटांसह वाहून आलेला कचरा, डांबर गोळे आणि तेलयुक्त तवंग पसरल्याने किनारा परिसर काळवंडला आहे. किनाऱ्यालगतची सागरी जैवविविधता आणि पारंपरिक मासेमारी व्यवसायावर याचा परिणाम जाणवतो आहे.
डहाणूतील नितांत सुंदर सागरी किनाºयाची पर्यटकांना भुरळ पडलेली आहे. वीकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक इथे दाखल होतात. गणपती विसर्जन काळात स्थानिकांप्रमाणेच परगावतील पर्यटक किनाºयावर मौजमजा करताना दिसतात. या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रावर जाण्यास पर्यटकांना बंदी आहे.
यंदा आॅगस्टमध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. या प्रवाहासह ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिक, झाडांचा पालापाचोळा, घरगुती वस्तूंचा कचरा समुद्रात वाहून गेला. उधाणाच्या भरती लाटांसह हा कचरा पुन्हा किनाºयावर आला आहे. सोबत खोल समुद्रातील डांबरीगोळे आणि तेलाचा तवंग पाण्यासह किनारपट्टीवर पसरला आहे. प्लास्टिक, पॉलिथीन आणि पालापाचोळा या कचºयावर तेलकट थर आणि रेतीमुळे ढिगारे होऊन साचला आहे.
ओल्या वाळूवर काळ्या रंगाचे डांबर पसरून चिंचणी ते बोर्डी ही ३३ किमी लांबीची किनारपट्टी विद्रूप झाली आहे. नारळी पौर्णिमेनंतर या भागात मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे होड्यांमध्ये जाळी, बर्फ, पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तू भरणाºया खलाशांना त्याचा त्रास होत आहे. किनाºयालगत पारंपरिक मासेमारी करताना जाळ्यांमध्ये अडकणारे प्लास्टिक, तेलकट पदार्थ चिकटत असून तवंगामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. शिवाय किनारी भागातील जैवविविधतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.