हितेन नाईक
पालघर : कोरोनामुळे मार्च महिन्यापासून बंद पडलेला जिल्ह्यातील पर्यटन व्यवसाय सुरू होण्याचे आदेश सोमवारी निघणार असून सुने सुने पडलेले बीच गर्दीने पुन्हा फुलून निघणार आहेत. त्यामुळे झाई ते वसईदरम्यानच्या हॉटेल्स, रिसॉर्ट मालकांनी जय्यत तयारी सुरू केली आहे.
कोरोनाच्या जागतिक संकटामुळे डहाणू ते वसई या ११२ कि.मी. किनारपट्टीसह आठ तालुक्यांतील पर्यटन व्यवसाय संकटात सापडला होता. गेल्या सात महिन्यांपासून व्यवसाय ठप्प झाल्याने व्यावसायिकांचे कोट्यवधींचे नुकसान झाले आहे. दुसरीकडे नेपाळ, यूपी आदी भागातील कामगार, स्वयंपाकी कोरोनाच्या भीतीने गावी निघून गेल्याने रिसॉर्ट मालकांची स्वयंपाकघरे बंद आहेत. मागच्या सात महिन्यांपासून एका पैशाचेही उत्पन्न नसताना पर्यटन निवासाची देखभाल, भली मोठी विद्युत बिले, कामगारांचे पगार-मानधन, ग्राम पंचायतीचे कर, सर्व्हिस कर, आयकर, विक्रीकर आदीचा मोठा भुर्दंड त्यांच्या डोक्यावर पडला आहे.
सप्टेंबर महिन्यात किचकट अशा अटी-शर्तीवर पर्यटनगृहे चालू करण्याची परवानगी शासनाने दिली असली तरी सर्व समुद्रकिनारे, बीच, धबधबा, गड-किल्ले यावर जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेश बजावले होते. आता नवीन आदेशाप्रमाणे परमिट रूम, बार, बिअर शॉपीसह हॉटेल्स, रिसॉर्ट यांना सकाळी ८ ते रात्री १० वाजेपर्यंत परवानगी दिली आहे. याचा आधार घेत जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यासाठी एक स्वतंत्र आदेश काढला आहे. या आदेशात रिसॉर्ट उघडी ठेवण्याचे नमूद करण्यात आले असले तरी समुद्र किनारे, बीच, धबधबे, नदी-नाले, गडकिल्ले यावर बंदी घालून लादण्यात आलेले मनाई आदेश मात्र रद्द करण्यात आले नाहीत. त्यामुळे बीचवर जाण्यास परवानगी नसेल, तर मग रिसॉर्टमध्ये जाऊन उपयोग काय? असा प्रश्न पर्यटकांकडून विचारला जात आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या मनाई आदेशाची मुदत ९ आॅक्टोबर रोजी संपली आहे. पावसाळ्याच्या कालावधीपर्यंतच हा मनाई आदेश असल्याने जिल्हाधिकाºयांशी चर्चा करून नवीन आदेश काढण्याची कार्यवाही करण्यात येईल.- डॉ. किरण महाजन, निवासी उपजिल्हाधिकारी