- लोकमत न्यूज नेटवर्कविक्रमगड : गत पाच महिन्यांपासून विक्रमगड नगरपंचायतीला मुख्याधिकारी नसल्याने सर्व कारभाराचा खोळंबा झाल्यामुळे विक्रमगडचे नगराध्यक्ष व नगरसेवकांनी केलले उपोषण अखेर बुधवारी रात्री उशिरा उपोषण सोडण्यात आल्याची माहिती नगराध्यक्ष रविंद्र खुताडे यांनी दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून देण्यात आलेले आश्वासन, तहसीलदारांची शिष्टाई आणि जव्हार नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांनी आठवड्यातून दोन दिवस काम करण्याचे दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलनाची ही तलवार तुर्त म्यान करण्यात आली आहे.मुख्याधिकारी नसल्याने व रस्त्याच्या कडेला असलेल्या गटावरील अतिक्रमण हटविण्यासाठी गेल्या दोन दिवसांपासून हे उपोषण सुरु होते. अखेर दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयाकडुन मुख्याधिकारी नेमणे बाबत शासनस्तरावर प्रयत्न केले जातील असे लेखी आश्वासन देण्यात आले. तहसीलदार आणि येथील सर्व शासकीय अधिकाऱ्यांनी एकत्र बैठक घेऊन पाठपुरावा करणार असल्याचे तहसीलदार सुरेश सोनवणे यांचे आश्वासन व बांधकाम अभियंता होले यांनी मेन बाजरपेठीतील रस्त्यालगची अतिक्रमणे हटविण्यास सुरुवात करुन आठ दिवसांत सर्व अतिक्रमणे हटविण्याचे आश्वासन दिले आहे. तसेच जव्हार नगरपरिषदेचे मख्याधिकारी वैभव विधाते यांनी बुधवार व शुक्रवार पुर्णवेळ विक्रमगड नगरपंचायतीचा कारभार स्विकारण्याचे लेखी पत्र दिल्याने अखेर बुधवारी रात्री उशिरा उपोषण सोडण्यात आले़ दरम्यान, हा तालुका, जिल्हा पातळीवर प्रश्न नसून तो मंत्रालयाच्या पातळीवर पाठपुराव्याने दुर होणार असल्याने उपोषण मागे घेतले गेले. मात्र, आता आंदोलनाची तयारी थेट मंत्रालयात राहील असेही यावेळी उपाषणकर्त्यांनी सांगीतले़. मात्र, मुख्याधिकारी नसल्याने येथील रहीवाशांची तसेच विद्यार्थी वर्गाची मोठी कोंडी झाली आहे.- मुख्याधिकारी नेमणुकीचा निर्णय उशीराने होत असल्याने या पंचक्रोशीतील विकास कामे देखील खोळंबली आहेत़ दरम्यान उपोषण मागे घेतांना नगरपंचायतीचे सर्व नगरसेवक, सामाजिक कार्यकर्ते निलेश सांबरे, प्रशासकीय अधिकारी, पत्रकार यांची उपस्थिती होती़
मध्यस्थीनंतर विक्रमगडच्या नगरसेवकांचे उपोषण मागे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 3:01 AM