वाडा : वाडा तालुक्यातील सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत कुडूस-कोंढला-उचाट हा रस्ता मंजूर झाला असून रस्त्याच्या रुंदीकरण व मजबुतीकरणाचे बांधकाम सुरू केले आहे. मात्र या रु ंदीकरणात शेतकऱ्यांच्या जागा जात असून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी या मागणीकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी कृती समितीने बुधवारपासून तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केले होते या उपोषणाची दखल सार्वजनिक बांधकाम विभागाने घेऊन जागेचे मोजमाप करून शासकीय दराप्रमाणे भरपाई देण्याचा प्रस्ताव वरिष्ठ कार्यालयाकडे पाठविण्यात येईल असे लेखी आश्वासन सायंकाळी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. कुडूस-कोंढला-उचाट हा सुमारे १२ ते १३ कि. मी. अंतराचा सर्वाधिक वर्दळीचा अंतर्गत रस्ता आहे. या रस्त्याच्या परिसरात अनेक कारखाने आहेत. या कारखान्यात कच्चा व पक्का माल घेऊन जाणाऱ्या येणाऱ्या वाहनांची संख्या जास्त असून या वाहनात ८० ते ९० टन वजनाची वाहने जात असल्याने रस्त्याची प्रचंड दूरवस्था झाली आहे.गेल्या अनेक वर्षापासून स्थानिक ग्रामस्थांनी रस्ता सुस्थितीत करावा यासाठी अनेकदा आंदोलने केली. त्यानंतर गेल्या दोन वर्षांपूर्वी पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून रस्त्याचे काम मंजूर करण्यात आले होते. रस्त्याचे काम सुरूही करण्यात आले होते. मात्र केंद्र सरकारकडून निधी न आल्याने रस्त्याचे काम बारगळले. आता पुन्हा या योजनेतून कुडूस-कोंढला-उचाट हा रस्ता मंजूर झाला असून कुडूस ते कोंढला या रस्त्याचे क्राँकीटीकरण तर उचाट पर्यंतच्या रस्त्याचे डांबरीकरण होणार आहे. त्याचे रुंदीकरण होणार असल्याने शेतकऱ्यांच्या जमिनी त्यात जाणार आहेत. या रस्त्याचे काम शेतकऱ्यांना विश्वासात न घेता संबंधीत ठेकेदाराने सुरू केल्याने शेतकऱ्यांत संतापाची लाट पसरली होती. (वार्ताहर)
आश्वासनानंतर शेतकरी समितीचे उपोषण मागे
By admin | Published: January 06, 2017 6:00 AM