मनोर : प्रलंबित मागण्या पूर्ण करण्यासाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे घंटा नाद आंदोलन करण्यात आले आणि घंटा वाजवून निषेध करण्यात आला. मागण्या पूर्ण होत नाही, तोपर्यंत आंदोलन करत राहण्याचा इशारा संघटनेचे उपाध्यक्ष भूपेश नेरुरकर म्हणाले.
शासनाकडून तत्त्वत: मान्य करण्यात आलेल्या परंतु शासन निर्णय निर्गमित न झालेल्या मागण्यांचा यात समावेश आहे. नायब तहसीलदाराला राजपत्रित अधिकाºयाचा दर्जा देण्यात आला असून ग्रेड पे मात्र ३ च्या पदाचा देण्यात आला आहे. ( सहाव्या वेतन आयोग नुसार) त्या पदाचा ग्रेड ३ चे पे ४३०० वरून ४६०० करण्यात यावा, महसूल लिपिकचे पदनाम बदलून महसूल सहाय्यक करण्यात यावे, अव्वल कारकून वर्ग ३ चे वेतन श्रेणीमधील त्रुटी दूर करण्यात याव्यात अशा एकूण आठ मागण्या आहेत. तसेच २००५ नंतर शासकीय सेवेत दाखल झालेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना २००५ पूर्वीच्या कर्मचाºयांप्रमाणे जुनी पेन्शन योजना लागू करणे, विभाग अंतर्गत जिल्हा बदलीचे अधिकार विभागीय आयुक्तांना प्रदान करावे, लिपिक शिपाई रिक्त पदे भरणे, अशा अन्य मागण्यांसाठी देखील हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे उपाध्यक्ष भूपेश नेरुरकर यांच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा कार्यालयाजवळ घंटा नाद करण्यात आला. यावेळी प्रसाद पाटील - चिटणीस, उषा भोये -विभागीय संघटक, प्रवीण कासरे - जिल्हा संघटक, संजय लाडे, निलेश मुकणे, विजय, देशमुख आदी सहभागी झाले.