पारोळ : वसई - विरार महानगरपालिकेच्या वसई विभागीय कार्यालयातील गुमास्ता परवाना (दुकान व आस्थापना नोंदणी व नुतनीकरण) विभागातील जोंधळेकर नावाचे अधिकारी महिन्यातून एकदाच येतात. त्या दिवशी जर शासकीय सुट्टी आली तर पुढील महिन्यापर्यंत व्यावसायिकांना परवाना मिळविण्यासाठी वाट पहावी लागते. त्यातूनच अनेकांना लेट फीचा भुर्दंड भरावा लागतो. दुकाने व आस्थापना नोंदणीसाठी वसई विभागात प्रत्येक आठवड्यात एक दिवस ठेवण्यात यावा, अशी मागणी नगरसेविका विद्या पाटील यांनी निरिक्षकांकडे मागणी केली आहे. वसई-विरार महापालिका हद्दीत दुकाने, व्यावसायिक यांना आपल्या दुकानाचे आस्थापना नोंदणी दुकान निरिक्षक अधिकारी यांच्याकडे करणे बंधनकारक आहे. नोंदणीसाठी बोईसर येथे कार्यालय आहे तर वसई तालुक्यातील व्यावसायीकांसाठी वसईत कार्यालय आहे. ही सेवा आॅनलाईन असल्याने एखादे कागदपत्र योग्य की अयोग्य हे आॅनलाईन नोंदणी करताना कळत नसल्यामुळे बऱ्याच वेळा संभ्रम निर्माण होतो. (वार्ताहर)
गुमास्ता खात्याच्या हलगर्जीचा धारकांना भुर्दंड
By admin | Published: February 17, 2017 12:10 AM