- हुसेन मेमन जव्हार : आदिवासी ग्रामीण तालुका, केवळ पावसाच्या पाण्यावर होणारी शेती आणि त्यावर चालणारी शेतकऱ्यांची गुजराण यामध्ये काहीतरी बदल करावा यासाठी जव्हारच्या कृषी विभागाने काही महिन्यांपूर्वीच जव्हारसारख्या ठिकाणी महाबळेश्वर येथील प्रमुख स्ट्रॉबेरीचे पीक काढून आधुनिक शेतीचा पाया रोवला आहे. वैयक्तिक स्वरूपात शेती केल्यानंतर सामूहिकरीत्या शेती केल्यास कशी फायद्याची ठरते, याविषयी प्रायोगिक तत्त्वावर खरवंद गावामध्ये सहा शेतकऱ्यांना एकत्र आणून हरभरा लागवड करण्यात आली. जव्हार कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून भरघोस पीक काढण्यात यश आले आहे. जव्हार तालुक्यातील हरभरा पिकाबाबत पालघर जिल्ह्यामध्ये सामूहिक शेतीचे एक नवे समीकरण कृषी विभागाच्या प्रयत्नातून समोर आले आहे. हरभरा लागवडीसाठी करावी लागणारी मशागत या संपूर्ण बाबीचे कौशल्य प्रात्यक्षिकरीत्या समजवण्यात आले होते. सदाशिव राऊत, विष्णू चौधरी, गोविंद गावित, बाळकृष्ण चौधरी, देवराम चौधरी, प्रितेश चौधरी या सहा शेतकऱ्यांनी सामुदायिक हरभरा पेरणी केलेली होती. हरभरा काढल्यानंतर आनेवारी काढली असता प्रति गुंठा १२ किलो १०० ग्राम उत्पन्न आले असून, एकूण उत्पन्न ६०० किलो हरभरा शेतातून काढण्यात आला आहे. यामुळे आता सामुदायिक शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढणार आहे.
सामूहिक शेतीच्या हरभरा लागवडीतून लाभ
By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2021 3:04 AM