मीरा रोड : गणेशोत्सव मंडळांनी वर्गणी मागण्यासाठी बळजबरी केल्याची तक्रार आल्यास खंडणीचा गुन्हा दाखल करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. शिवाय ध्वनिप्रदूषण टाळण्यासाठी डीजे, डॉल्बीला मनाई करतानाच पारंपरिक वाद्येही आवाजाच्या मर्यादेत वाजवा अशी तंबी दिली आहे.
सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणारी मंडळे तसेच वसाहती, चाळ कमिटी यांनी वर्गणी गोळा करण्याआधी धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी व मंजुरी घेणे बंधनकारक आहे. शिवाय वर्गणी गोळा करण्यासाठी नागरिक, व्यापाऱ्यांसोबत बळजबरी करू नये असे आवाहन सहायक अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी केले आहे. उत्सव साजरा करताना बहुतांश मंडळांकडून धर्मादाय आयुक्तांकडून नोंदणी वा परवानगी घेतली जात नाही. तसेच नागरिक, व्यापाºयांना अनेकवेळा वर्गणीसाठी दमदाटी व जबरदस्ती केली जाते. याआधी काही प्रकरणात मंडळांच्या पदाधिकाºयांवर खंडणीचा गुन्हाही दाखल केला गेला आहे. त्यामुळे मनमानी वर्गणी मागणे मंडळ वा वसाहत, चाळ समित्यांना अडचणीचे ठरणार आहे. मंडळांनी नोंदणी करून व सर्व परवानगी घेऊनच उत्सव साजरा करावा असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार रस्त्याच्या एक तृतीयांश जागेतच मंडप उभारावा व ध्वनिप्रदूषणाचे नियम पाळावेत.