भार्इंदर : राज्य शासनाच्या स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत मीरा-भार्इंदर महापालिका शहरात ६३५ शौचालये बांधणार असून त्यासाठी शासनाकडून प्राप्त अनुदानापैकी पहिल्या टप्प्यात ३५ लाख १० हजाराचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे.भारत स्वच्छता अभियानांतर्गत राज्य शासनाने महाराष्ट्रात २०१७ पर्यंत हागणदारी मुक्तीचे उद्दिष्ट ठेवले असून आहे. त्यानुसार, मीरा-भार्इंदर पालिकेनेही आपल्या हद्दीचे सर्वेक्षण करून स्वतंत्र शौचालय बांधण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. सुरुवातीला ९५० जणांनी स्वतंत्र शौचालयासाठी अर्ज केले आहेत. त्यांची छाननी केल्यानंतर केवळ ६३५ अर्ज वैध ठरविले आहेत. लाभार्थ्यांना प्रशासन प्रति शौचालयामागे २२ हजार रु. अनुदान देणार असून त्यातील ६ हजार रु.चा पहिला हप्ता २२ जणांना दिला आहे. सध्या २२ स्वतंत्र शौचालयांचे बांधकाम सुरू असून पालिकेने ३५ लाख १० हजार रु.च्या अनुदानाचे वाटप लाभार्थ्यांना केले आहे. लाभार्थ्यांना अनुदान दिल्यानंतर त्यांनी सुमारे १५ दिवसांत ते बांधणे आवश्यक ठरणार आहे. शहरात सुमारे ३५ हजार झोपड्या असून त्यातील अनेक जण स्वतंत्र शौचालया अभावी उघड्यावर शौच करीत असतात. त्यामुळे हजारो शौचालये आवश्यक असून सध्या केवळ ६३५ बांधकामांना प्रशासनाने परवानगी दिली आहे. (प्रतिनिधी)
भार्इंदर महापालिका ६३५ शौचालये बांधणार
By admin | Published: November 09, 2015 2:36 AM