- हुसेन मेमन, जव्हार
गेले दोन दिवस लोकमतने घणाघाताने मांडलेल्या आश्रम शाळांच्या रखडलेल्या भांडे खरेदीची गंभीर दखल राज्याचे मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय यांनी घेतली असून त्याबाबत कारवाई सुरू केली आहे. यामुळे गेली दोन वर्षे फुटक्या भांड्यात शिजविलेले अन्न गळक्या ताटातून खाण्याची विद्यार्थ्यांवर आलेली वेळ लवकरच टळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याबाबतच्या लोकमतमधील वृत्ताची कात्रणे क्षत्रिय यांनी आदिवासी विकास खात्याचे सचिव राजगोपाल देवराकडे कारवाईसाठी पाठविली आहेत. विशेष म्हणजे रविवारच्या अंकात प्रसिध्द झालेल्या याबाबतच्या वृत्ताची दखल मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयानेही रविवारी घेतली होती. त्यापाठोपाठ आता मुख्य सचिवांनीही हि दखल घेतल्यामुळे या भांडे खरेदीत झारीतले शुक्राचार्य झालेल्यांचे धाबे दणाणले आहे. भांडी पुरविणारा कंत्राटदार तुमचा कि आमचा या देवरा व सवरा यांच्या वादात ही खरेदी सापडल्याने ती गेली दोन वर्षे रखडली होती. त्यामुळे फुटक्या कढया पातेली यांना साबण अथवा एमसील ची ठिगळे लावून स्वयंपाक करावा लागत होता. निविदा मंजूर झाली तरी या भांडी व सामुग्रीच्या खरेदीचा आदेश आदिवासी विकास सचिव राजगोपाल देवरा यांनी दाबून ठेवला आहे.सारे खाबुगिरीसाठीच !अॅल्युमिनियम अथवा हिंडालियम यांची भांडी पाण्याच्या संपर्कात आली की झिजतात, फुटतात, गळतात त्यामुळे शक्यतो स्टेनलेस स्टील च्या भांड्यांची खरेदी करावी असा संकेत असतांनाही कमिशनच्या खाबुगिरीपोटी याच भांड्यांची खरेदी होत होती.