पालघर : केंद्र सरकारने लादलेल्या कृषी कायद्याच्या विरोधात दिल्ली येथे शेतकऱ्यांनी पुकारलेल्या भारत बंदच्या आवाहनाला जिल्ह्यातील भाजप वगळता सर्व पक्षांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. त्यामुळे जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवा वगळता दुकाने, रिक्षा सेवा जवळपास बंद होती. काही भागांत निदर्शने करण्यात आली असली तरी कुठेही गालबोट लागल्याची घटना घडली नाही. काही ठिकाणी कृषी कायद्याची प्रतिकात्मक हाेळी करण्यात आली.केंद्रातील भाजप सरकारने सप्टेंबरमध्ये तीन कृषी कायदे पारित केले आहेत. हे तिन्ही कायदे शेतकऱ्यांना मारक असल्याने त्यांनी दिल्ली येथे मोठे आंदोलन उभारले आहे. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत असतानाही पंतप्रधान मोदी सरकारकडून हे कायदे मागे घेतले जात नसल्याने शेतकऱ्यांनी भारत बंदचे आवाहन केले होते. हे कायदे पारित करताना कुठल्याही शेतकरी संघटनांना विश्वासात न घेता हे कायदे लादण्यात आल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.जिल्ह्यातील शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस, बहुजन विकास आघाडी, जनता दल, मार्क्सवादी कम्युनिष्ट पक्ष आदींसह अनेक आदिवासी, मच्छीमार संघटनांनी या बंदला पाठिंबा दर्शविला होता. तलासरीमध्ये माकपने रस्त्यावर उतरून शेतकरीविरोधी विधेयकांविरोधात घोषणा दिल्या. पालघर, बोईसरमध्ये शिवसेनेने मोटारसायकल रॅलीद्वारे केलेल्या बंदच्या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने बाजारपेठा बंद होत्या. तर कर्मचारी वेळेवर कार्यालयात उपस्थित राहू न शकल्याने कार्यालयांत शुकशुकाट जाणवत होता. एसटीच्या २६ फेऱ्या रद्दभारत बंदच्या आवाहनामुळे नागरिकांनी बाहेर पडण्याचे टाळल्याने पालघर परिवहन विभागाच्या ४०८ एसटी फेऱ्यांपैकी ३८२ फेऱ्या नियमित सुरू होत्या, तर २६ फेऱ्या प्रवाशांच्या कमी संख्येअभावी रद्द करण्यात आल्याची माहिती विभाग नियंत्रक अधिकारी आशिष चौधरी यांनी दिली. या वेळी जिल्ह्यात दंगल नियंत्रक पोलीस बलाच्या गाड्या, पोलीस मोठ्या संख्येने तैनात करण्यात आले होते.
जव्हार तालुक्यात कडकडीत बंद जव्हार : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी धोरण स्वीकारत नव्याने कायदा संमत केला असल्याचा आरोप करून शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला महाविकास आघाडी सरकारनेही पाठिंबा दर्शविला आहे. सरकारच्या आवाहनाला प्रतिसाद देत जव्हार, मोखाड्यातील बाजारपेठेत १०० टक्के कडकडीत बंद पाळण्यात आला.या बंदला जव्हार, मोखाड्यातील व्यापाऱ्यांनी पाठिंबा देत आपली दुकाने बंद ठेवली होती. त्यामुळे दोन्ही तालुक्यांमध्ये कडकडीत बंद यशस्वी झाला आहे. आमदार सुनील भुसारा यांनी मोखाडा, जव्हार आणि विक्रमगड तालुक्यांचा दौरा करून बंदचा आढावा घेतला आहे. तसेच जव्हारमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घातले. तर भारत बंदमध्ये सहभागी झाले. जव्हार न्यायालयातील वकील बार असोसिएशनने बंदला पाठिंबा दिला आहे.
नागझरीत आंदाेलकांची निदर्शने मनोर : केंद्र सरकारने आणलेल्या कृषी कायद्याविरोधात भारत बंदला मनोरमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला. बाजारपेठ, मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेले हॉटेल, गॅरेज, दुकाने कडकडीत बंद ठेवून आंदोलनाला समर्थन देण्यात आले, तर सीपीएमने नागझरी येथे रास्ता रोको करून निषेध केला.दिल्ली येथे गेल्या बारा दिवसांपासून शेतकऱ्यांचे कृषी विधेयक कायदा रद्द करण्यासाठी आंदोलन सुरू आहे, तरी सरकार कोणत्याच प्रकारचे निर्णय घेत नसल्याने आज सर्वपक्षीय संघटनांतर्फे भारत बंदच्या हाकेला मनोर परिसरातील काँग्रेस, सेना, राष्ट्रवादी काँग्रेस, सीपीएम व इतर संघटना तसेच दुकानदार, ऑटोरिक्षा, मॅजिक, जीप, ट्रक मालक-चालक यांनी प्रतिसाद दिला. मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत असलेले हॉटेल, ढाबे व विविध प्रकारच्या दुकानमालकांनी बंद ठेवून समर्थन दिले. चिल्हार-बोईसर रस्त्यावर नागझरी येथे सीपीएमच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केले.या वेळी काँग्रेस अल्पसंख्याक अध्यक्ष असिफ मेमन, सेनेचे राजू मुदरक, बहुजन विकास आघाडीचे मोमेज रईस, कैफ रईस, राष्ट्रवादी काँग्रेसचे मुनिर शेख, साजिद खतीब, सीपीएमचे सुदाम दिंडा, हिना वनगा, सुनील सुर्वे, विनायक गोऱ्हेकर आंदोलनात सहभागी झाले होते. यावेळी जाेरदार घाेषणा देण्यात आल्या.तलासरी, उधवा येथे कडकडीत बंदतलासरी : केंद्र सरकारने शेतकरीविरोधी केलेल्या कायद्याच्या निषेधार्थ मंगळवारी पुकारलेला भारत बंद तालुक्यात उधवा व तलासरी येथे कडकडीत पाळण्यात आला. माकपच्या किसान सभेने या भारत बंदला पाठिंबा दर्शविला होता. व्यापारी वर्गाने बंदला सहकार्य करावे, असे आवाहन माकपने केल्याने तलासरी उधवा बाजारपेठ उत्स्फूर्त बंद करण्यात आली हाेती. बंददरम्यान कोणातीही अनुचित घटना घडू नये यासाठी तलासरी पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
विक्रमगड बाजारपेठेत शुकशुकाटकेंद्र सरकारच्या शेतकरीविराेधी कृषी कायद्यामुळे देशभरातील शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी विविध पक्ष, संघटनांनी पुकारलेल्या भारत बंदला विक्रमगडमध्ये उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. येथील बाजारपेठेत शुकशुकाट हाेता, तर रस्त्यांवर तुरळक वर्दळ दिसून आली. या बंदला पाठिंबा देण्यासाठी विक्रमगडमधील माकपचे काॅ. किरण गहला, राजा गहला, काँग्रेसचे घनश्याम आळशी, पराग पष्टे, शरयू औसरकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवा सांबरे, रमेश धोडे, यादव गभाले, संजना गभाले, शिवसेनेचे सागर आळशी, योगेश भानुशाली आदी कार्यकर्ते उपस्थित होतेे.
वसईमध्ये बंदला संमिश्र प्रतिसाद वसई/पाराेळ : केंद्र शासनाच्या शेतकरी कायद्याविरोधात मंगळवारी पुकारण्यात आलेल्या ‘भारत बंद’ला वसई-विरारमध्ये संमिश्र प्रतिसाद मिळाला. या भागातील औद्याेगिक वसाहती, दुकाने, व्यापारी केंद्रे बंद ठेवण्यात आली हाेती. या बंदला बहुजन विकास आघाडी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसने पाठिंबा दिला हाेता. सकाळपासूनच या पक्षांचे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून केंद्र सरकारविराेधात जाेरदार घाेषणाबाजी केली.बंदच्या पार्श्वभूमीवर सकाळपासून रस्त्यांवर शुकशुकाट हाेता. अत्यावश्यक सेवा वगळता, औद्योगिक वसाहती, व्यापारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. मुंबई-अहमदाबाद महामार्गावर तुरळक वाहतूक सुरू होती. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागात असेच चित्र हाेते. वसईत ‘भारत बंद’ मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला नसला, तरी शहरी व ग्रामीण अशा दोन्ही भागांत त्याला संमिश्र प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील शेतकरीही बंदमध्ये सहभागी झाले होते. केंद्र शासनाने अंमलात आणलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकरी उद्ध्वस्त होणार आहे. त्यामुळे हा कायदा केंद्र शासनाने रद्द करावा आणि शेतकऱ्यांना हमीभाव द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
मोखाड्यात कडकडीत बंद मोखाडा : केंद्र सरकाने अंमलात आणलेल्या कृषी कायद्याविरोधात तसेच हा कायदा मागे घेण्यात यावा, या मागणीसाठी ठिकाणठिकाणच्या शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी मोखाड्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. बंदला राष्ट्रवादी, शिवसेना, कॉंग्रेस, बहुजन विकास आघाडीने पाठिंबा दिला. यावेळी आमदार सुनील भुसारा, सेनेचे झेडपी सदस्य प्रकाश निकम, प्रमोद कोठेकर, तालुका प्रमुख अमोल पाटील, बविआचे तालुका अध्यक्ष अमजद अन्सारी आदी उपस्थित होते. यावेळी मोखाडा तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. एकूणच कडकडीत बंद पाळण्यात आला.