मीरारोड: भिमा -कोरेगाव घटनेचे आंबेडकरी जनतेत संतप्त पडसाद उमटले व त्याचा निषेध करण्यासाठी बुधवारी राज्यभर बंद पुकारला गेला असतानाच बुधवारी सायंकाळी मात्र आरपीआय आठवले गटाच्या उपाध्यक्षाने स्वत:च्या वाढदिवशी रस्ता अडवून चक्क अश्लिल नाच गाण्याचा कार्यक्रम ठेवल्याने संताप व्यक्त होत आहे. या वेळी पैसे देखील उडवण्यात आले. दुपारी आंदोलनात सहभागी व्हायचे आणि रात्री अश्लिल नाचगाणी ठवायची. हीच का आंबेडकरी समाजा बद्दलची संवेदनशीलता असा सवाल देखील केला जात आहे.भिमा - कोरेगाव घटने प्रकरणी विविध आंबेडकरवादी संघटना व पक्षांनी जोरदार निषेध करत बुधवारी राज्यभर बंद पुकारला होता. बंदला ठिकठिकाणी हिंसक वळ लागले. मीरा भाईंदर मध्ये देखील ठिकठिकाणी रास्ता रोको करण्यात आला. विशेष म्हणजे या आंदोलनात आंबेडकरी जनतेत संताप असताना दुसरी कडे मीरा भार्इंदर मध्ये मात्र आरपीआय आठवले गटाचे जिल्हा उपाध्यक्ष सुनिल शर्मा यांनी वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा केला.भाईंदर पश्चिमेच्या स्मशान भुमी समोरचा नारायणा शाळे जवळचा रस्ता अडवुन स्टेज बांधण्यात आला होता. त्याच ठिकाणी शर्मा यांचे आरपीआय आठवले गटाचे कार्यालय देखील आहे. रात्री सदर ठिकाणी भोजपुरी अश्लील अर्थांच्या गाण्यांवर अश्लील नृत्य करण्यात आले. या वेळी जमलेल्या कार्यकर्ते तसेच लोकांनी नर्तकींवर पैशांची उधळण देखील केली.रात्री उशीरापर्यंत हा धागडधिंगा सुरु असल्याचे परिसरातील काही रहिवाशांनी सांगत संताप व्यक्त केला. मुलांच्या शाळा व परिक्षा सुरु असताना या अश्लील नाच गाण्याच्या रात्री पर्यंतच्या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना देखील मन:स्ताप झाला. सदर कार्यक्रमास ध्वनिक्षेपकाची तसेच महापालिका व वाहतूक पोलीसांकडून परवानगी घेण्यात आली होती का हे समजू शकले नाही.देवेंद्र शेलेकर (जिल्हाध्यक्ष, आरपीआय आठवले गट ) - शर्मा हे रिक्षा संघटनेचे पदाधिकार असुन अश्लील नाचगाण्याचा कार्यक्रम ठेवल्याची आपल्याला कल्पना नव्हती. वरिष्ठांशी बोलुन कार्यवाही करु.सुनिल भगत (भारिप, जिल्हाध्यक्ष) - हा अतिशय संतापजनक व लाजीरवाणा प्रकार आहे. त्याचा निषेध करतो. यांना आंबेडकरवादी चळवळीचा गंधच नसुन फक्त स्वार्थासाठी ही लोकं येतात आणि चळवळ व समाजास बदनाम करतात.संगीता धाकतोडे ( संत रोहिदास बहुउद्देशिय सामाजिक संस्था ) - भिमा - कोरे घटनेने समाजात संताप असताना त्याचे भान राखले पाहिजे होते. दलित चळवळीला काळीमा फासणारया ह्या अशा प्रवृत्तींचा निषेध करावा तेवढा थोडाच आहे.
भार्इंदर: आरपीआय पदाधिका-याचा स्वत:च्या वाढदिवशी रस्ता अडवून अश्लिल नाच गाण्याचा कार्यक्रम
By ऑनलाइन लोकमत | Published: January 04, 2018 4:34 PM