भार्इंदर : मीरा रोड येथील ‘पूनमसागर’ इमारतीत दोन दिवसांपूर्वी राकेश भट या युवकाचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाला. यानंतर, जागे झालेल्या मीरा-भार्इंदर महापालिका प्रशासनाने त्या परिसरात डासांची शोधमोहीम सुरू केली. या वेळी ३ हजार २०० घरांची झाडाझडती घेतली असता अनेक ठिकाणी साठलेल्या पाण्यात डेंग्यूच्या डासांच्या अळ्या सापडल्या, अशी माहिती उपायुक्त व स्वच्छता विभागप्रमुख डॉ. संभाजी पानपट्टे यांनी दिली.शहरातील नवीन बांधकाम प्रकल्पांच्या ठिकाणी बांधण्यात येणारी पाण्याची टाकी, पाणीसाठा, पावसाळ्यामुळे पडणारे खड्डे, टायरट्युबमध्ये साठवलेले पाणी, घरातील फुलदाणी, फ्रीजचा मागील भाग, वातानुकूलित यंत्रात अनेक दिवस पाणी साचल्यास डासांची उत्पत्ती होते. झाडांच्या कुंड्यांखालील ताटात साचलेले पाणी रिकामे न केल्यास त्यातही डासांची पैदास होते. उघड्यावर पाणी साठवण्यात येणाऱ्या भांड्यांतही डासांच्या अळ्या आढळल्या आहेत. उघड्यावर साठवलेले पाणी वेळेत बदलून वापरण्यात येणारे भांडे स्वच्छ करून ते बंदिस्त ठेवणे अपेक्षित असतानाही अनेक जण ते टाळतात. परिणामी, डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव होऊन डेंग्यू, मलेरियासारखे आजार बळावतात. शहरात गेल्या काही महिन्यांत मोठ्या प्रमाणावर डेंग्यूचे रुग्ण आढळल्याचे प्रशासनाने सांगितले. अलीकडेच मीरा रोडमध्ये राकेशचा डेंग्यूसदृश आजाराने मृत्यू झाल्याचे उजेडात आल्याने स्वच्छता विभागाने त्वरित डास शोधमोहीम सुरू केली आहे. डास नियंत्रण पथकाचे प्रमुख अनिल राठोड यांच्या मार्गदर्शनाखालील पथकाने डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णांच्या परिसरातील तीन हजार २०० घरांची झाडाझडती घेतली. त्यात त्यांना पाणी साठवलेल्या ठिकाणी डेंग्यूच्या डासांच्या अळ्या आढळल्या. त्या जागा त्वरित कोरड्या क रून त्यावर डासनाशक औषधांची फवारणी केली. डासांच्या उत्पत्तीला कारणीभूत ठरणाऱ्या व्यावसायिकांकडून आर्थिक दंड वसूल केला. (वार्ताहर)
भार्इंदरला सुरू झाली डास शोधमोहीम
By admin | Published: August 29, 2016 4:25 AM