राजू काळे, भार्इंदरशहराची वाढती लोकसंख्या व इतर प्रमुख महापालिकांना प्रती माणशी होणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या तुलनेत येथील नागरीकांना होणारा पाणीपुरवठा अत्यल्प असल्याने शहराला ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणीपुरवठा शासनाकडून मंजूर होण्याची शक्यता पालिकेच्या सूत्रांनी व्यक्त केली आहे. शहराची लोकसंख्या सुमारे १२ लाखांवर गेली असून गतवेळच्या जनगणनेनुसार यंदाच्या लोकसंख्येत सुमारे ४० ते ५० टक्यांची वाढ गेल्या १० वर्षांत झाल्याचे स्पष्ट झाले आहे. प्रती वर्षी सरासरी ५० ते ६० हजारांने लोकसंख्या वाढत असून शहराकडे स्वत:चा जलस्त्रोत नसल्याने या वाढत्या लोकसंख्येला आजमितीस स्टेम कंपनीकडून ३० व एमआयडीसीकडून १०६ असा एकूण १३६ एमएलडी पाणीपुरवठा दररोज होत आहे. तो प्रती माणसामागे सुमारे १०० लीटर दररोज असून तो इतर प्रमुख महापालिकांच्या तुलनेत कमी आहे. शहरातील पाणीसमस्या मार्गी लावण्यासाठी आघाडी सरकारने मंजूर कोट्यातील १०० एमएलडी पाण्यातून २० एमएलडी पाणी तातडीने दिले आहे. तर उर्वरीत पुरवठ्याच्या अंमलबजावणीची प्रक्रीया युती सरकारने पूर्ण करून ७५ एमएलडी पाणी दिले. पाण्याची नितांत गरज लक्षात घेऊन जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी येत्या काही महिन्यांच्या काळात शहराला १०० ते १२५ एमएलडी पाणी देणार असल्याचे सुतोवाच मीरारोड येथे नुकत्याच पार पडलेल्या कार्यक्रमात केले होते. हे पाणी मिळेल तेव्हा मिळेल पण प्रशासनाने अतिरीक्त २५ एमएलडी पाणीपुरवठ्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरु केला असून शहराला ७५ ऐवजी थेट १०० एमएलडी पाणीपुरवठा होण्याची शक्यता असल्याचे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. सध्या २६९ कोटींच्या ७५ एमएलडी पाणीपुरवठा योजनेची प्रक्रीया सुरु असून ते शहराला मिळण्यास सुमारे दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागणार आहे. त्यावेळीही झपाट्याने विकसित होत असलेल्या शहरासाठी तो काहीसा दिलासा देणारा असला तरी तो अपुराच ठरणार असल्याचे मत काही जलतज्ञांनी व्यक्त केले आहे. याबाबत पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश वाकोडे यांनी सांगितले की, शहराला ७५ एमएलडी पाणी मिळणारच आहे. परंतु, अतिरीक्त २५ एमएलडी पाणी शहराला मिळण्यासाठी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा सुरु आहे.
भार्इंदरला लवकरच मिळणार ७५ ऐवजी १०० एमएलडी पाणी
By admin | Published: October 28, 2015 11:08 PM