मीरारोड - भाईंदर पुर्वेचे भाजपा नगरसेवक गणेश शेट्टी यांनी कोरोना विरोधातील लढ्यासाठी आपले ऑगस्ट २०२२ साला पर्यंतचे २९ महिन्यांचे मानधन आणि भत्ते न घेण्याचा निर्णय घेतला असुन तसे लेखी पत्र त्यांनी आयुक्त चंद्रकांत डांगे यांना दिले आहे. शेट्टी यांच्या मानधन - भत्तेची रक्कम ३ लाख रुपयांच्या वर जाणार आहे.कोरोना मुळे सर्वच ठप्प असुन नोकराया, व्यवसाय, उद्योग बंद पडल्याने मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. महापालिके पासुन सरकारला सुध्दा महसुल मिळेनासा झाला आहे. मीरा भाईंदर महापालिका आधीच अवास्तव कामे आणि टेंडर टक्केवारीच्या आरोपां मुळे वादग्रस्त ठरलेली असुन कर्जाच्या ओझ्याखाली आहे. पालिकेला मिळणाराया जीएसटी तसेच राज्या कडुन निधी, मुद्रांक शुल्क अधिभार आदी मध्ये मोठी कपात होणार आहे. शहरातील विकासकामांवर विपरीत परिणाम होऊन पालिकेचा गाडा हाकणे अवघड होणार आहे.त्यातच कोरोना विरुध्दच्या लढ्यात मोठ्या प्रमाणात निधी लागणार असल्याने आपण नगरसेवक म्हणुन दरमहा मिळणारे १० हजार रुपयांचे मानधन तसेच अन्य भत्ते हे नगरसेवप पदाचा कार्यकाळ संपे पर्यंत म्हणजेच ऑगस्ट २०२२ पर्यंत घेणार नसल्याचे आयुक्तांना कळवले आहे असे शेट्टी म्हणाले. ते भाईंदर पूर्वेच्या प्रभाग ३ चे नगरसेवक आहेत. गणेश शेट्टी यांच्या या निर्णयाचे नागरिकांसह राजकिय व प्रशासकिय क्षेत्रातुन स्वागत होत आहे. या आधी नगरसेवक रवी व्यास यांनी आपले ६ महिन्यांचे मानधन - भत्ते स्विकारणार नसल्याचे पत्र पालिकेला दिले होते. व्यास यांनी नगरसेवक, पालिका अधिकारी - कर्मचारी यांना सुध्दा मानधन - वेतन कमी घेण्याचे आवाहन केले होते.
भाईंदरचे गणेश शेट्टी यांनी कोरोनासाठी सोडले नगरसेवक पदाच्या उर्वरीत २९ महिन्यांच्या कार्यकाळाचे मानधन - भत्ते
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2020 11:39 AM