भिवंडी : महापालिका स्थायी समिती सभापतीपदी काँग्रेसचे मो. हालीम मो. हरून अन्सारी यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. भिवंडी महापालिकेत काँग्रेसचे बहुमत असतानाही अलीकडेच भाजप-कोणार्क विकास आघाडीने त्यांचा महापौर बसवला होता. त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या आपल्याकडे राखण्यात काँग्रेसला यश आले आहे. या निवडणुकीसाठी कोकण आयुक्त डॉ. जगदीश पाटील यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांची पीठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती केली होती.
सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. महापौरपदाच्या निवडणुकीनंतर ही निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार होती. मात्र, त्यामध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने कोकण आयुक्तांच्या आदेशाने ही निवडणूक रद्द करून नव्याने घेण्याचे निर्देश देण्यात आले होते. त्यावेळी भाजप-कोणार्क विकास आघाडीचे नगरसेवक सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर, आज झालेल्या निवडणुकीसाठी १८ डिसेंबर रोजी नामांकन दाखल केले होते. मात्र, सुमित पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल न करताच ते माघारी परतले. त्यामुळे काँग्रेसचे अन्सारी यांची स्थायी समिती सभापतीपदी बिनविरोध निवड होणार, हे निश्चित झाले होते. या निवडणुकीत सभापतीपदासाठी अन्सारी यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल असल्याने पीठासीन अधिकारी तथा जिल्हाधिकारी नार्वेकर यांनी अन्सारी यांची निवड जाहीर केली.च्अन्सारी यांची बिनविरोध निवड झाल्यावर पीठासीन अधिकारी डॉ. राजेश नार्वेकर व पालिका आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी अन्सारी यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले व शुभेच्छादिल्या. अन्सारी यांनी मावळते सभापती मदन (बुवा) नाईक यांच्याकडून पदाचा कार्यभार स्वीकारला.च्यावेळी जिल्हा प्रशासन अधिकारी प्रकाश बोरसे, उपायुक्त दीपक कुरु ळेकर, नगरसचिव अनिल प्रधान उपस्थित होते. अन्सारी यांंचे काँग्रेस पदाधिकारी माजी महापौर जावेद दळवी, काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष शोएब गुड्डू, सभागृह नेते प्रशांत लाड, प्रदेश सरचिटणीस पप्पू रांका यांनीही शुभेच्छा दिल्या.