वाडा : भिवंडी - वाडा - मनोर हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला असून गत दीड वर्षाच्या कालावधीत येथे अनेक अपघात होऊन ३१ जणांचा मृत्यू झाला आहे. शासकीय आकडेवारी नुसार ८ जण जखमी झाले असले तरी ही आकडेवारी अधिक आहे. खराब रस्ता, जागोजागी खड्डे, अपूर्ण काम, अतिवेग आदी कारणे पुढे येत आहेत.मुंबई - अहमदाबाद व मुंबई - आग्रा या प्रमुख दोन रस्त्यांना जोडणारा दुवा म्हणून भिवंडी - वाडा - मनोर हा रस्ता आहे.त्यावरील वाढती वाहतूक व वाड्यातील औद्योगिकीकरण लक्षात घेता राज्य शासनाने या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गेल्या पाच वर्षांपूर्वी मंजूरी देऊन या रस्त्याचे काम बांधा वापरा व हस्तांतरित करा या तत्त्वावर सुप्रीम कंपनीला देण्यात आले. या कंपनीने गेल्या पाच वर्षांत रस्त्याचे काम पूर्ण केल नाही. सोळा किमी अंतरावर वनविभागाच्या जागेत हा रस्ता अद्यापही दुपदरीच आहे. तर देहर्जे, पिंजाळ या नद्यांवरील पुलांची कामे अपूर्ण आहे. वाडा ते मनोर या अंतराचा रस्ता कंपनीने दर्जात्मक बनवला असल्याने हा रस्ता अतिशय चांगला झाला आहे. मात्र वाडा ते अंबाडी हा २७ किमी अंतराचा रस्ता निकृष्ट दर्जाचा झाल्याने प्रत्येक पावसात तो खड्डेमय होतो आहे. या विरोधामध्ये अनेक आंदोलने झाली आहेत. प्रत्येक पावसाळ्यात खड्डेमय रस्त्यांची डागडुजी केली जाते. पुन्हा स्थिती तिच अशी स्थिती आहे.मनसेकडून आज खड्ड्यांचे नामकरणच्वाडा तालुक्यातील बहुतांशी रस्ते खड्ड्यात गेले असून त्याचा त्रास नागरिकांना होत आहे. मात्र प्रशासन याची दखल घेत नाही. या वर उपाय म्हणून रस्त्यावरील खड्यांना मंत्री, खासदार व आमदार यांची नावे देण्याचे अनोखे आंदोलन येत्या शुक्र वारी (दि.२०) छेडण्यात येणार असल्याचा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे. या प्रकरणी तहसीलदारांना निवेदन दिले आहे. भिवंडी वाडा मनोर या मुख्य रस्त्यासह अनेक अंतर्गत रस्ते खड्ड्यात गेले आहेत.काही रस्ते तर मे महिन्यात बनविण्यात आले असून जुन महिन्यात त्याची दुर्दशा झाल्याची उदाहरणे आहेत. बांधकाम प्रशासनाकडे तक्रारी करूनही त्याची दखल घेतली जात नाही. मुख्य रस्ता असलेला भिवंडी वाडा रस्त्यासाठी टोल आकारला जात असतांनाही या रस्त्यावर अनेक ठिकाणी गुडघाभर खड्डे पडले आहेत. या रस्त्याकडे सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेचे लक्ष वेधण्यासाठी हे आंदोलनाचा असणार आहे.
भिवंडी-वाडा-मनोर रस्ता धोक्याचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 2:16 AM