लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - राज्यातील पहिल्या संगीत गुरुकुलाची भूमिपूजन बुधवारी प्रख्यात गायिका उषा मंगेशकर यांच्या हस्ते संगीतमय वातावरणात पार पडले . ह्या लता मंगेशकर संगीत गुरुकुलात संगीताचे शिक्षण देण्याची व ते चालवण्याची जबाबदारी मंगेशकर कुटुंबीय घेईल असे वचन देत आहे असे यावेळी उषाताई म्हणाल्या .
संगीत कलाप्रेमींना दर्जेदार संगीत शिकता यावे व शहराचे नावलौकिक व्हावे. गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या स्मृती कायम जपल्या जाव्यात यासाठी त्यांच्या नावे संगीत गुरुकुल उभारण्याची संकल्पना आ. सरनाईक यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे मांडली होती. मुख्यमंत्र्यांनी त्यास मान्यता देत संगीत गुरुकुल उभारण्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता.
आ. सरनाईक यांच्या प्रयत्नाने मीरारोड येथील महापालिका आरक्षण क्रमांक २४६ पदमभूषण ध्यानचंद मैदानात हे लता मंगेशकर संगीत गुरुकुल उभारले जाणार असून त्याचे भूमिपूजन उषा मंगेशकर यांनी केले . त्या नंतर काशीमीरा येथील लता मंगेशकर नाट्यगृहात भूमिपूजन निमित्त कार्यक्रम पार पडला . यावेळी आमदार प्रताप सरनाईक व गीता जैन , आयुक्त संजय काटकर , अतिरिक्त आयुक्त डॉ . संभाजी पानपट्टे व अनिकेत मानोरकर , शहर अभियंता दीपक खांबित , शिवसेना जिल्हाप्रमुख राजू भोईर , निशा नार्वेकर , विक्रमप्रताप सिंह , माजी नगरसेविका वंदना पाटील , भावना भोईर आदी उपस्थित होते .
ह्या संगीत गुरुकुल मधून संगीत क्षेत्रातले अनेक हिरे बाहेर पडतील . कला क्षेत्रा सह क्रीडा क्षेत्रासाठी सुद्धा गुरुकुलची गरज असून त्यासाठी प्रयत्न करणार असे आ. गीता जैन म्हणाल्या . अश्या संस्थांच्या माध्यमातून शहर उभं राहते व ती शहराची ओळख होते . ह्या संस्था शहराच्या राहणीमान निर्देशांक मध्ये नक्कीच वाढ करतील. कला रसिक पिढीला खऱ्या अर्थाने प्रशिक्षित करण्यासाठी हे संकुल उभे राहील असे आयुक्त संजय काटकर म्हणाले .
उषाताई यांच्या आगमनाने नाट्यगृहाची वास्तू आणि भूमिपूजनची जागा धान्य झाली. संगीत गुरुकुल इमारत पूर्ण झाल्यावर ती आम्हाला चालवण्यास द्या असे भरपूर जण सांगतात . राजकारण व सत्ता बदल होत राहतील मात्र ह्या संगीत गुरुकुल मध्ये गोरगरीब सर्वसामान्यांना संगीताची शिक्षा मंगेशकर कुटुंबीयांनी द्यावी अशी विनंती या . सरनाईक यांनी बोलताना उषाताईंना केली .
आ. सरनाईक यांची विनंती स्वीकारत संगीत गुरुकुल मंगेशकर कुटुंबीय चालवण्याचे वचन देते. हे कार्य नक्कीच चांगल्या रीतीने पार पाडू असे उषा मंगेशकर म्हणाल्या . संगीताचा प्रचार - प्रसार लहान मुलां पासून मोठ्यां पर्यंत , सर्व भाषेतून , विविध वाद्य प्रकारां मधून व्हावा अशी लतादीदींची इच्छा होती . त्याचा भार महापालिकेने उभारला आहे . गुरुकुल उभे राहणार याचा आनंद आहे .
ठाण्याला सरनाईकांनी आमच्या वडिलांची पुण्यतिथी साजरी केली तेव्हा पासून त्यांची ओळख . कलेच्या प्रचारासाठी ताठ उभे आहेत याची खात्री आहे . प्रतापराव यांच्या चेहऱ्यावरचा निश्चय पाहून खात्री झाली कि हे गुरुकुल नक्कीच उभे राहणार . ते ठाण्यात सुद्धा संगीत गुरुकुल उभारणार आहेत . आम्ही सर्व मंगेशकर कुटुंबीय त्यांच्या सोबत आहोत असे उषाताई म्हणाल्या .
संगीत गुरुकुल मध्ये काय काय ?
तळ अधिक एक मजल्याची इमारत बांधली जाणार आहे. या इमारतीचे क्षेत्रफळ २३९३. चौ. मी. एवढे आहे. या इमारतीच्या कामात म्यूजिकल लायब्ररी , म्युझिकल क्लास रूम , म्युझिकल प्रॅक्टिस व डबिंग रूम असेल. तसेच लॅण्ड स्केपिंग, संगीत विद्यालयाचे आकर्षक प्रवेशद्वार , पार्किंग सुविधा , म्युरल , लिफ्ट व इतर आवश्यक कामे केली जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात २१ कोटींचा खर्च होणार आहे. हे संगीत विद्यालय राज्य सरकारच्या संगीत विद्यापीठाशी संलग्न करण्यात येईल.