विरार: लाचखोरीप्रकरणी अटकेत असलेल्या वसई विरार महापालिकेच्या नगररचना विभागातील उपसंचालक वाय. एस. रेड्डी याचे वसईतील वसई विकास सहकारी बँकेतील लॉकरमध्ये ३४ लाख रुपयांची रोकडआणि दोन किलो सोने हाती लागले. त्याआधी हैदराबाद येथील घरात ९२ लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडल्याची माहिती अँटीकरप्शनच्या अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, ठाणे कोर्टाने आज दुपारी रेड्डी यांची जामिनावर मुक्तता केली.शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांना कोर्ट केसेस आणि गैरव्यवहाराबाबत आवाज न उठवण्यासाठी रेड्डी यांनी १ कोटी रुपयांचे आमिष दाखवले होते. यातील २५ लाख रुपये देत असताना ठाणे अँटीकरप्शनच्या पथकाने ठाणे येथील एका हॉटेलमधून रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर अँटीकरप्शनच्या पथकाने रेड्डींच्या मालमत्तेची तपासणी सुरु केली असता रोख रकमेसह कोट्यवधी रुपयांची मालमत्ता असल्याचे उघडकीस आले आहे. दोन दिवसांपूर्वी अँटीकरप्शनने रेड्डींना वसई विकास बँकेतील लॉकर उघडण्यासाठी वसईत आणले होते. मात्र, यावेळी चुकीची चावी आणल्याने पथकाला रिकाम्या हाताने परतावे लागले होते. मात्र, पथकाने लॉकर सील केले होते. आज अँटीकरप्शनचे पथक रेड्डींना घेऊन बँकेत पुन्हा आले होते. यावेळी लॉकरमध्ये ३४ लाख रुपये रोख आणि दोन किलो सोने सापडले. त्याआधी अँटीकरप्शनच्या पथकाने हैदराबाद आणि कोची येथील घराची झडती असता त्याठिकाणी ९२ लाख रुपये रोख आणि चार किलो सोने सापडले. मात्र, तेथील बँकेची लॉकर उघडला आलेली नाहीत, अशी माहिती पोलीस निरीक्षक अनिल होनराव यांनी दिली. याव्यतिरिक्त रेड्डी याच्याकडे वसई, मुंबईत काही फ्लॅट आहेत. तर हैदराबाद आणि कोची येथे उच्चभ्रू वस्तीत दहाहून अधिक आलिशान फ्लॅट आणि दोन बंगले असल्याचे उघडकीस आले होते. रेड्डी यांनी हैदराबाद आणि कोची येथे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून बांधकाम व्यवसाय सुरु केल्याचेही तपासात उजेडात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)मालमत्ता पाहून अधिकारीही गेले चक्रावूनवसई विरार महापालिकेतील एका अधिकाऱ्याकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता हाती लागल्याने अँटीकरप्शनचे अधिकारीही चक्रावून गेले आहेत. सिडकोतून प्रतिनियुक्तीवर आलेले रेड्डी सहा वर्षांपासून वसई विरार पालिकेत ठाण मांडून बसले आहेत. मध्यंतरी पालिकेने त्यांना सेवेत सामावून घेण्याचा ठरावही केला होता. पण, सिडकोने रेड्डी यांचा राजीनामा नाकारल्याने रेड्डी पालिकेत प्रतिनियुक्तीवर काम करीत होते. सिडकोपासून रेड्डी यांचे येथील बिल्डर आणि आर्किटेक्टशी घनिष्ट संबंध आहेत. त्यामुळे रेड्डी यांच्या काळात दिलेल्या बांधकाम परवानग्यांची चौकशी केली तर मोठा घोटाळा उजेडात येईल, अशी माहिती शिवसेना गटनेता धनंजय गावडे यांनी दिली. गेल्या गुरुवारपासून अँटीकरप्शनच्या ताब्यात असलेल्या रेड्डींची ठाणे कोर्टाने आज जामिनावर सुटका केली.
रेड्डीच्या वसईतील लॉकरमध्ये मोठे घबाड
By admin | Published: May 05, 2016 1:05 AM