विक्रमगड/तलवाडा : प्रसिध्द असलेला गावठी हापूस व केसर सध्या विक्रमगडच्या बाजारात मोठया प्रमाणात दाखल होत असून हापूस ५० रुपये किलो तर केसर ६० रुपये किलो दराने विक्री होत आहे. सध्या आंब्याचा सीझन असल्याने गावठी केसर हापूसचा आस्वाद घेण्यास सुरुवात केली असून काही लोक बाजारात बसलेल्या विक्रेत्याकडून एकदम टोपलीमध्ये असलेल्या सर्व आंब्याचा भाव करुन खरेदी करतांना दिसत आहेत. काही आंबा विक्रेत्या महिला डोक्यावर टोपले घेऊन घरोघरी फिरुन आंब्यांची विक्री करतांना दिसत आहे.दरवर्र्षी हा आंबा बाजारात येताच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडत असते.दरम्यानच्या काळात सध्या विक्रमगड व परिसरात मोठया प्रमाणावर गावठी आंबा दाखल होत असल्याने रोजच्या जेवणात त्याचा आस्वाद हा घेतला जातो. स्वस्त व चविष्ट गावठी आंबे मूबलक मिळत असल्याने सर्वच त्यावर ताव मारतांना दिसत आहेत.काही दिवसांवर पाऊस येऊन ठेपल्याने एकदा का पाऊस आला की आंब्याचे भाव एकदम कोसळून आंबा खरेदीमध्येही घट होते व तो फेकून द्यावा लागतो.त्यामुळे पाउस पडण्यापूर्वीच सर्व आंबा विकला जाईल अशीे बागायतदारांची धडपड असते.यंदा आंब्यांचे उत्पादन कमी झाल्याने व निसर्गाच्या लहरीपणामुळे हा हंगाम लांबत चालेला आहे. त्यामुळे पिकण्याचा कालवधी लांबत जाउन जून उजाडला आहे. पाऊस लगेच सुरू झाला तर लाखो रुपयांचे आंबे खराब होऊन बागायतदारांना फटका बसणार आहे. त्यामुळे काहीही करून आहे तो आंबा त्यापूर्वी विकण्याचे त्यांचे प्रयत्न आहेत.विक्रमगड या आदिवासी ग्रामीण तालुक्यांत मोठया प्रमाणांत सन-१९९० पासुन शासनाच्या शंभर टक्के अनुदान तत्वावर फलोत्पादन योजनेचे अंतर्गत आंबा लागवड करण्यांत आली आहे.गेल्या १०/१५ वर्षापासुन विक्रमगड तालुक्यात मोठया प्रमाणात आंब्यांचे उत्पादन या भागातील छोटे-मोठे बागायदार वर्ग घेत आहे.विक्रमगडच्या स्थानिक मातीत तयार झालेला हापूस, केसर, लंगडा, पायरी या आंब्यांना मोठी स्थानिक मागणी असल्याने तो विक्रमगड बाजारपेठेतच संपतो.तसेच बाहेर गावाचा ग्राहक देखील विक्रमगड येथील याच आंब्यांना पसंती देतो.त्यातूनच शेतकरी वर्गास चांगले उत्पन्न मिळते. यंदा मात्र निसर्गाच्या लहरीपणाने हवामानात मोठे बदल होऊन आंब्यांच्या झाडांचा मोहर करपला. वेळेवर आंबा तयार झाला नाही, व जूनमध्ये आंब्यांची आवक वाढली व भाव पडले. (वार्ताहर)
विक्रमगडात यंदा झाली आंब्याची प्रचंड आवक
By admin | Published: June 03, 2016 1:43 AM