लोकमत न्यूज नेटवर्क मीरा रोड : अनेक परवानग्या शिल्लक असताना निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन भाजपा नेत्यांनी सूर्या पाणी योजनेचे भूमिपूजन केले. प्रकल्पाचे नारळ तर सर्वच फोडतात, पण काम आमच्याशिवाय होणार नाही, असा खरमरीत इशारा बहुजन विकास आघाडीचे नेते व आमदार हितेंद्र ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांना दिला.बविआच्या कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. बविआमुळेच मेहता व जैन महापौर झाल्याचा दावा त्यांनी केला आणि येणारा महापौरही आमच्याशिवाय बसणार नाही, असे सूचित केले. त्यांच्या या इशाºयामुळे बविआ आणि भाजपात बिनसल्याचे व त्यांच्यातील समझोत्याची चर्चा बंद झाल्याचे मानले जाते. तसे झाल्यास बहुजन विकास आघाडी सर्व जागा लढवण्याची शक्यता वर्तवली जाते.मीरा-भार्इंदरसाठी २१८ दशलक्ष लीटर पाणी पुरवणाºया सूर्या योजनेचे भूमिपूजन ऐन निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. ही योजना वसई-विरारसह मीरा-भार्इंदरसाठी असतांना त्याचे ठाकूरांना निमंत्रणच नव्हते. भाजपा आ. नरेंद्र मेहतांकडून पालिका निवडणुकीतील बविआसोबतच्या युतीसाठी सतत ठाकूरांच्या दरबारात हजेरी लावली जात असतांनाही ठोस निर्णय होत नसल्याने शहरातील बविआचे इच्छुक हवालदिल आहेत.या पार्श्वभूमीवर मीरा रोड येथील बविआच्या कार्यकर्ता व इच्छुकांच्या मेळाव्यात ठाकूर काय बोलतात याकडे अनेकांचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे ठाकुरांनी भाजपासह थेट मुख्यमंत्री व मेहतांना लक्ष्य करत टोले लगावले. सूर्या पाणी योजनेची कोणाला माहिती तरी आहे का? मीरा- भार्इंदरमधील नेत्यांनी जाहीरपणे व्यासपीठावर याबाबत माझ्याशी चर्चेची तयारी दाखवावी. तसे असेल तर मीरा भार्इंदरला जलवाहिनी वेगळी देणार का? महामार्ग, वन विभाग आदींच्या परवानग्या मिळाल्या नसताना नारळ कसले फोडता? आदिवासींच्या व खाजगी जमिनींमधून जलवाहिनी जाणार आहे तो प्रश्न सोडवलाय का? असे प्रश्न ठाकूर यांनी विचारले. ठाकूर यांचे प्रकल्पाबाबतचे चर्चेचे आव्हान आ. मेहता यांनी स्वीकारल्याची चर्चा आहे.आज सूर्याचे नारळ फोडले. उद्या मेट्रोचे फोडतील. अगदी विमानतळाचे नारळसुध्दा फुटतील, असा चिमटा त्यांनी काढला. नारळ कोणीही फोडले तरी मीरा-भार्इंदरला सूर्याचे पाणी आम्हीच देणार आहोत, असा दावा त्यांनी केला. आमच्या नगरसेवकांची संख्या किती याचा विचार करु नका. २००७ साली दोन नगरसेवक असताना मेहता महापौर झाले ते बविआमुळे. आता भाजपाच्या गीता जैन महापौर झाल्या त्यादेखील बविआच्या मदतीमुळे. नगरसेवकांची संख्या कमी असली, तरी आमच्याशिवाय महापौर बसणार नाही, असे ठाकूर यांनी सुनावले.
बविआचे भाजपाशी बिनसले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 1:13 AM