आशिष राणे
वसई - राज्य निवडणूक आयोगाने सोमवारी महाराष्ट्र राज्यातील धुळे, पालघर, नंदुरबार, वाशिम, अकोला आणि नागपूर येथील जिल्हा परिषदेच्या ओबीसी आरक्षणा शिवाय पोटनिवडणुका जाहीर केल्याने संतप्त झाल्याच्या पार्श्वभूमीवर ओबीसी विरोधी महाविकास आघाडीच्या विरोधात भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्च्याच्या वतीने बुधवारी (15 सप्टेंबर) सकाळी 11 ते 1 दरम्यान वसई तहसीलदार कार्यालयावर धरणे व निर्दशने आंदोलन करण्यात येणार असल्याचे भाजपचे महामंत्री उत्तम कुमार यांनी लोकमतला सांगितले.
राज्यातील महाविकास आघाडीच्या ओबीसी विरोधी धोरणामुळे व नाकर्तेपणामुळेच आज ही आपल्या ओबीसी समाजावर वेळ आली असल्याचे भाजपचे म्हणणे आहे. तर आपल्या प्रत्येक मंडळाने मोठ्या संख्येने या सरकार विरोधी निर्णयाच्या निषेधाचे फलक घेऊन हे आंदोलन यशस्वी करणेसाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष राजन नाईक, संघटन महामंत्री महेंद्र पाटील आणि राजू म्हात्रे आणि भाजप ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष नरेश पाटील यांनी केले आहे.