उल्हासनगर : महापालिका परिवहन समितीचे सदस्य राजकुमार सिंग सभापतीपदाच्या निवडणुकीच्यावेळी गैरहजर राहिल्याने भाजप उमेदवाराचा पराभव झाला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपने बुधवारी सिंग यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. दरम्यान, सिंग हे ओमी टीमच्या संपर्कात असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
उल्हासनगर महापालिका परिवहन समितीमध्ये भाजपचे बहुमत असताना समिती सदस्य सिंग गैरहजर राहिल्याने पक्षाचे शंकर दावानी यांचा पराभव तर महाविकास आघाडीचे दिनेश लाहरानी यांचा विजय झाला. भाजपचे दावानी व आघाडीचे लाहरानी यांना समसमान सहा मते मिळाल्याने चिठ्ठी काढण्यात आली. यामध्ये आघाडीचे लाहरानी यांची सभापतीपदी निवड झाली. परिवहन समितीमध्ये बहुमत असताना महापौरपाठोपाठ परिवहन समिती सभापतीपदी भाजप उमेदवाराचा पराभव झाल्याने भाजपच्या स्थानिक नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहे. पक्षाचे नेते व माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी बैठक होऊन सभापतीपदाच्या निवडणुकीत गैरहजर राहणाऱ्या सिंग यांची शहर जिल्हाध्यक्ष व आमदार कुमार आयलानी यांनी पक्षातून हकालपट्टी केली. विधानसभा निवडणुकीत ओमी टीमच्या पंचम कलानी यांना शब्द देऊन विधानसभेची उमेदवारी न दिल्याने, कलानी समर्थकांत नाराजी पसरली होती. याचा वचपा काढण्यासाठी भाजपतील ओमी समर्थक नगरसेवकांनी महापौर निवडणुकीत पक्षादेश झुगारून महाविकास आघाडीच्या लीलाबाई अशान यांना मतदान करून महापौरपदी निवडून आणले. तोच प्रकार परिवहन समिती सभापतीपदाच्या निवडणुकीत घडला.समितीत बहुमत असतानाही सिंग निवडणुकीला ऐनवेळी गैरहजर राहिल्याने दावानी यांचा पराभव झाला. अखेर, पक्षविरोधात काम केल्याचा ठपका सिंग यांच्यावर ठेवून त्यांची पक्षातून हकालपट्टी केली. सिंग हे भाजप मंडळ-१ चे अध्यक्ष असून पक्षात सक्रिय होते.निष्ठावंतांना डावलल्याचा रागपरिवहन समितीच्या सभापतीपदी भाजपने निष्ठावंताला उमेदवारी नाकारल्याने याचा राग आला. यामुळे मी निवडणुकीला गैरहजर राहिलो, अशी प्रतिक्रिया राजकुमार सिंग यांनी दिली आहे. सिंग यांच्या हकालपट्टीमुळे शहरातील उत्तर भारतीय मतदार भाजपपासून दुरावण्याची शक्यता वर्तवली जात आहे.