वसई : वसई-विरार महानगरपालिकेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता असून या पार्श्वभूमीवर वातावरण तापू लागले आहे. अलीकडेच परिवहन सेवेच्या उद्घाटनावरून बहुजन विकास आघाडी आणि शिवसेना यांच्यामध्ये कलगीतुरा रंगल्याचे पाहायला मिळाले असताना, आता महापालिकेने ५० टक्के रद्द केलेल्या कराविषयी भाजपने असमाधान व्यक्त करीत संपूर्ण कर रद्द करा, अन्यथा आयुक्तांनाच घेराव घालण्याचा इशारा दिला आहे.
वसई-विरार महापालिकेने पालिका क्षेत्रातील व्यापाऱ्यांना काही दिवसांपूर्वी ‘ट्रेड लायसन्स’ कर लावला होता. त्या संदर्भातील विरोधानंतर महापालिकेने करात ५० टक्के कपात केली आहे. मात्र, या सवलतीवर भाजप समाधानी नाही. भाजपने वसईमध्ये व्यापाऱ्यांची बैठक घेऊन हा कर रद्द करण्याची मागणी केली होती. भाजपने एका पत्रकाद्वारे व्यापाऱ्यांचा या करास विरोध असल्याची स्वाक्षरी मोहीम राबविली. त्यानंतर महापालिकेने करात ५० टक्के सवलत दिली, परंतु त्यावर भाजप समाधानी नाही. भाजप जिल्हा महासचिव उत्तम कुमार यांनी सांगितले की, पूर्वी विरारमधून तर आता ठाण्यातून वसई-विरार महानगरपालिकेचा कारभार चालत आहे. एका पक्ष कार्यलयाप्रमाणे कामे केली जात आहेत किंवा करून घेतली जात आहेत.
हा कर अन्यत्र नाही, मग आम्ही का भरायचा?या अशा प्रकारामुळे भविष्यात महानगरपालिकेवरचा जनतेचा विश्वासच उडून जाईल, अशी एकंदरीत परिस्थिती आहे. करात ५० टक्के कमी केल्याचे जे गाजर महापालिकेने दिले आहे, त्याचा आम्ही निषेध करतो. मुळात जो कर अन्यत्र कुठेच नाही, तो आम्ही का भरायचा? असा सवाल उत्तमकुमार यांनी केला आहे.
पालिका निवडणुकीसाठी भरत राजपूत सहप्रभारीपदी
लोकमत न्यूज नेटवर्कडहाणू : डहाणू नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरतसिंग राजपूत यांनी कोरोना काळात डहाणू, जव्हार, विक्रमगड तालुक्यातील रोजगारासाठी स्थलांतरित झालेल्या आदिवासींना गुजरातमधून पुन्हा डहाणूत आणण्यासाठी केलेले प्रयत्न, त्यांना भोजनाबरोबरच घरपोच करण्यासाठी उपलब्ध करून दिलेले वाहन याची दखल घेत, भाजपने राजपूत यांची वसई-विरार महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी सहप्रभारीपदी निवड केली आहे. यामुळे डहाणूच्या भाजप कार्यकर्ता, पदाधिकाऱ्यांत नवचैतन्य निर्माण झाले आहे. मुंबईत महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणीची बैठक आयोजिली होती. यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राजपूत यांची सहप्रभारीपदी नियुक्ती करून जबाबदारी सोपविली आहे. वसई-विरारमध्ये उत्तर भारतीयांची लोकवस्ती जास्त आहे. त्यावर लक्ष केंद्रित करून पक्षाने राजपूत यांची निवड केली आहे.