पालघरमध्ये भाजपची सत्ता संपुष्टात; वाशिम, नंदुरबारमध्ये आघाडीला संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 06:38 AM2020-01-09T06:38:22+5:302020-01-09T06:39:45+5:30
पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे.
पालघर : पालघर जिल्हा परिषदेच्या ५७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत १८ जागा जिंकत शिवसेना हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसनेही जोरदार उसळी घेत १५ जागा जिंकल्याने या जिल्ह्यावरील भाजपची सत्ता संपुष्टात आली आहे. लोकसभा, विधानसभपाठोपाठ जिल्हा परिषदेच्या सत्तेतूनही भाजप हद्दपार झाली आहे. निवडणुकीपूर्वी महाआघाडीच्या वाटाघाटी यशस्वी न झाल्याने निकालानंतर एकत्र येण्याचे संकेत शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिले होते. त्यानुसार आता जिल्हा परिषदेवर महाआघाडी सत्तारूढ होईल. शिवसेनेने ५७ पैकी ४६ जागांवर उमेदवार उभे केले होते. त्यातील १८ जागी विजय मिळवत त्या पक्षाने जिल्ह्यातील वर्चस्व सिद्ध केले. त्यात पालघर तालुक्यात त्या पक्षाच्या दोन जागा वाढून तेथे त्यांनी १० जागा मिळवल्या, तर वसई १, डहाणू ३, विक्र मगड १, जव्हार १, वाडा २ तर वसई १ अशा १८ जागा या पक्षाने जिंकल्या.
तलासरी, मोखाडा या दोन तालुक्यांत त्यांची पाटी कोरी राहिली. राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागांवरून थेट १५ जागांपर्यंत उसळी घेतली. विक्रमगड, वाडा आणि जव्हार तालुक्यात जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे आणि आमदार सुनील भुसारा यांच्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादीने भाजपचे वर्चस्व (पान ९ वर)(पान १ वरुन) मोडीत काढले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षानेही मागील चार जागांमध्ये दोनची भर घालत सहा जागा जिंकल्या. तसेच तलासरी तालुक्यावरील वर्चस्व सिद्ध केले. मागील २१ जागांवरून भाजपची घसरगुंडी होत तो पक्ष १० जागांवर स्थिरावला. आठ पंचायत समित्यांपैकी एकाही पंचायत समितीवर भाजपला वर्चस्व प्रस्थापित करता आले नाही.
जिल्ह्यात विधानसभेचे ३ आमदार असूनही बहुजन विकास आघाडीला मागील १० जागा राखता आल्या नाहीत. यावेळी फक्त चार जागांवर समाधान मानावे लागले. बालेकिल्ला असलेल्या वसई तालुक्यातही त्यांना अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. या वेळी अपक्षांच्या संख्येत वाढ झाली. त्यांनी तीन जागा मिळवल्या. काँग्रेसने एक जागा राखण्यात यश मिळविले. जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यानंतर महाआघाडी करण्याबाबत स्थानिक नेत्यांची प्राथमिक स्तरावर बोलणी झाली होती. मात्र आपले बलस्थान असलेल्या तालुक्यांत मित्रपक्षांना वाटा देण्यात शिवसेनेने फार स्वारस्य दाखविले नाही. त्यामुळे काही ठिकाणी परस्परांना मदत करण्याचे, मैत्रीपूर्ण लढण्याचे आश्वासन देत सर्व पक्ष स्वबळावर रिंगणात उतरले. निकालानंतर सत्तेसाठी एकत्र येण्याचा निर्णय तेव्हाच घेण्यात आला होता.
>पालघर जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
एकूण
जागा - ५७
शिवसेना - १८
राष्ट्रवादी - १५
भाजप - १०
माकप - ६
बहुजन विकास आघाडी - ४
अपक्ष - ३
काँग्रेस - १
मनसे - ०
>सहा जिल्हा परिषदेतील पक्षीय बलाबल
जिल्हा काँग्रेस राष्टÑवादी शिवसेना भाजप इतर एकूण
नागपूर ३० १० १ १५ २ ५८
नंदुरबार २३ ३ ७ २३ ० ५६
धुळे ७ ३ ४ ३९ ३ ५६
वाशिम ९ १२ ६ ७ १८ ५२
पालघर १ १५ १८ १० १३ ५७
अकोला ४ ३ १३ ७ २६ ५३
(भारिप-बहुजन महासंघाला अकोल्यात २३ तर वाशिममध्ये ९ जागा)