लोकमत न्यूज नेटवर्क
मीरारोड - गृहसंकुलातील वाहनतळाच्या जागा ह्या गृहनिर्माण संस्थेच्या सामायिक व सार्वजनिक वापराच्या असताना त्यांना कर आकारणीचा बेकायदा आणि मनमानीपणे घेतलेला निर्णय नागरिकांवर अतिरिक्त कर लादणारा अन्यायकारक असल्याने तो तात्काळ रद्द करावा अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा भाजपाचे जिल्हाध्यक्ष ऍड. रवी व्यास यांनी दिला आहे .
मीरा भाईंदर महापालिकेचे उपायुक्त रवी पवार यांनीशहरातील सदनिका खरेदी करताना वाहनतळ नमूद असलेल्या वाहनतळास मालमत्ता कर आकारणी करण्याचे आदेश कर विभाग व प्रभाग अधिकारी यांना दिले होते . वास्तविक गृहसंकुलातील वाहनतळाच्या जागा ह्या गृहनिर्माण संस्थांच्या सार्वजनिक व सामायिक मालकीच्या असल्याने त्याची विक्री विकासकाला करता येत नसताना बेकायदा व्यवहार केले जातात . शिवाय त्या जागांचा वापर हा रहिवाशी स्वतःच्या मालकीची वाहने उभी करण्यास करतात .
तसे असताना पालिकेने वाहनतळांना मालमत्ता कर आकारणीचा फतवा काढल्याने लोकमत ने या बाबतचे वृत्त देताच ह्या कर आकरणीला विरोध होऊ लागला आहे . भाजपाचे जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक ऍड. रवी व्यास यांनी वाहनतळांना मालमत्ता कर आकारणी करण्याचा निर्णय बेकायदा असून तो त्वरित रद्द करावा अन्यथा आंदोलन करावे लागेल असा इशारा दिला आहे .
मुळात स्थानिक स्वराज्य संस्थेच्या अधिकार क्षेत्रामध्ये नविन कर आकारणी सारखा घोरणात्मक निर्णय घ्यावयाचा असल्यास त्या बाबतचा रितसर प्रस्ताव महासभेत सादर करावा लागतो. महासभेच्या मंजुरी नंतर त्याबाबतचा प्रशासकीय आदेश काढला जातो. परंतु उपायुक्त पवार यांनी गृहनिर्माण सहकारी संस्थाच्या वाहनतळाला कर आकरणी करण्याचा हा निर्णय लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता, कायदेशीर प्रक्रीया डावलून घेतलेला आहे . शहरातील करदात्या नागरीकावर अतिरिक्त बोजा टाकणारा अन्यायकारक निर्णय आहे असे ऍड. व्यास यांनी आयुक्त दिलीप ढोले यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे .