प्रशांत मानेराजकारण हा तर टोपी घालण्याचा, टोपी फिरवण्याचा खेळ. निवडणुकीच्या धामधुमीत इच्छुकांची संख्या अधिक असेल, तर इतरांना टोपी घालून उमेदवारी मिळवणे, हेही कसब. एकदा का तिकीट मिळवले की, सभा, मेळावे, प्रचार रॅली यांची मोठी धामधूम असते. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक म्हटले की, राष्ट्रीयस्तरावरील नेत्यांच्या मोठमोठ्या सभा मतदारसंघांत होत असतात. मातब्बर नेत्यांनी आपल्यासाठी सभा घ्यावी, यासाठी उमेदवारांची घालमेल सुरू असते. अमुक एका जातीधर्माचा मतदार आमच्या मतदारसंघात जास्त आहे. त्यामुळे त्या वर्गाला भावणाऱ्या राष्ट्रीय नेत्यांना मतदारसंघात आणून मतदारांना आकर्षित करणे, हे नित्याचे. प्रचाराची सांगता होईपर्यंत सभांचा धडाका सुरू राहत असल्याने यात नेत्यांची, पत्रकारांचीही तारांबळ उडते. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघातील पोटे मैदानात भाजपाचे राष्ट्रीय नेते राजनाथ सिंह यांची महायुतीचे उमेदवार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेला युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते. सभेची वेळ दुपारी १ ची होती. भरउन्हात कार्यकर्ते बसले होते. राजनाथ यांच्यासारखे राष्ट्रीय नेते येणार म्हणून भाजपा कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. सभेचे वृत्तांकन करण्यासाठी आलेल्या पत्रकारांसाठी वेगळा कक्ष नव्हता. त्यामुळे त्यांच्या बसण्याची सोय कार्यकर्त्यांच्या पुढील बाजूस करण्यात आली होती. सभेच्या ठिकाणी राजनाथ सिंह तब्बल दोन तास उशिरा पोहोचले. रणरणत्या उन्हाचा त्रास जसा कार्यकर्त्यांना होत होता, तसे पत्रकारही कासावीस झाले होते. पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या कमी पडल्या. तहानेने व्याकूळ झालेले पत्रकार उन्हाच्या चटक्यांनी भाजून पुरते हैराण झाले होते. अखेर, उन्हापासून बचाव करण्यासाठी भाजपाच्या कार्यकर्त्यांनी पत्रकारांना भाजपाच्या टोप्या आणून दिल्या. आता या टोप्या डोक्यावर चढवाव्या की न चढवाव्या, या विचाराने पत्रकार गोंधळले असताना काहींनी टोप्या डोक्यावर ठेवल्या व मग पटापट पत्रकारांनी भाजपाच्या टोप्यांनी आपली तापलेली माथी झाकली. याचीच वाट पाहणाºया भाजपाच्या मंडळींनी कार्यकर्त्यांप्रमाणे टोप्या घातलेल्या पत्रकारांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची शक्कल लढविण्यात आली.