सत्ता गमावल्याचा भाजपला फटका, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला यश
By ऑनलाइन लोकमत | Published: January 9, 2020 12:23 AM2020-01-09T00:23:14+5:302020-01-09T00:24:53+5:30
माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला.
हितेन नाईक
पालघर : माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांच्यापर्यंत अनेक भाजप नेत्यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावूनही राज्यातील सत्ता गमावल्याचा फटका या पक्षाला पालघर जिल्हा परिषदेत बसला. त्याच वेळी विधानसभेत तीन आमदार पाठवणाऱ्या बहुजन विकास आघाडीला स्थानिक निवडणुकीत वसईतील मतदारांनी झटका दिला आहे. दुसरीकडे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेने मात्र सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत.
भाजपने जिल्ह्यातील आपली सत्ता राखण्यासाठी जोरदार प्रयत्न केले होते. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, माजी राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, खासदार कपिल पाटील आदींसह अनेक नेत्यांनी जिल्ह्यात प्रचार केला होता, मात्र राज्यातील सत्ता जाताच भाजपला पालघर जिल्ह्यातील मतदारांनीही नाकारल्याचे दिसून येत आहे. अशा रीतीने लोकसभा आणि विधानसभेबरोबर आता जिल्हा परिषदेच्या सत्तेतूनही भाजपला हद्दपार व्हावे लागले आहे. मागील वेळच्या २१ जागांपैकी ११ जागा भाजपला गमावाव्या लागल्या आहेत. त्यांना केवळ १० जागांवरच समाधान मानावे लागले आहे. भाजपला जिल्ह्यातील ८ पंचायतींपैकी एकाही पंचायत समितीत सत्ता स्थापन करता आलेली नाही, हे विशेष.
भाजपप्रमाणेच जिल्ह्यात विधानसभेचे ३ आमदार असलेल्या बविआलाही मोठा फटका बसला आहे. मागील वेळी त्यांच्या १० जागा होत्या. मात्र त्यांना ६ जागांचा फटका बसत अवघ्या ४ जागांवरच समाधान मानावे लागले. बविआचा बालेकिल्ला असलेल्या वसई तालुक्यातही त्यांची कामगिरी अत्यंत निराशाजनक झालेली आहे. त्यांना ४ जागांपैकी अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले. विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश संपादन करीत तीन आमदार निवडून आणलेल्या बहुजन विकास आघाडीची तालुक्यातच झालेली पिछेहाट चिंतेची बाब ठरली आहे.
या निवडणुकीत शिवसेनेने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या असून राष्ट्रवादी काँग्रेसनेही ४ जागांवरून थेट १५ जागांवर आश्चर्यकारक मुसंडी मारली आहे. राज्यातील आघाडीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने उसळी घेत १५ जागांसह मित्रपक्षाने ११ जागा अशा एकूण २६ जागा जिंकल्याने पालघर जिल्हा परिषदेवर महाविकास आघाडीची सत्ता प्रस्थापित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग होऊ शकला नव्हता. कारण चर्चा करून तडजोड करण्याएवढा पुरेसा वेळ कोणत्याच पक्षाला मिळाला नव्हता. त्यामुळे आपापल्या ताकदीनुसार सर्वच पक्ष निवडणुकीच्या रिंगणात स्वतंत्रपणे उतरले होते. त्यातल्या त्यात राष्ट्रवादी काँग्रेसने काही ठिकाणी स्थानिक आघाडींशी दिलजमाई करीत स्वत:ची ताकद जिल्ह्यात वाढवल्याचे दिसून येत आहे.
पालघर जिल्हा परिषदेत मागील निवडणुकीत एकूण ५७ गटांपैकी भाजप २१ सदस्य, शिवसेना १५+१ (सेना बंडखोर अपक्ष), बविआ १०, माकप ५, राष्ट्रवादी ४, काँग्रेस १ असे पक्षीय बलाबल होते. शिवसेनेने भाजपबरोबर असलेली युती तोडून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी हातमिळवणी करीत राज्यात सत्ता स्थापन केल्यामुळे भाजपला राज्याच्या सत्तेतून पायउतार व्हावे लागले होते. त्यामुळे पालघर जिल्हा परिषदेतील सत्ता राखण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. मात्र मतदारांनी भाजपला नाकारले आहे. भाजपच्या स्थानिक नेत्यांतील अंतर्गत मतभेदांमुळे जिल्ह्यात त्यांना अपेक्षित यश मिळू शकले नसल्याची चर्चा आता होताना दिसत आहे.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत शिवसेनेने ५७ पैकी ४६ जागांवर आपले उमेदवार उभे केले होते. मात्र तरीही १८ उमेदवार निवडून आणीत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. राज्यात सत्ता असल्याचा फायदा शिवसेनेला मिळाला असल्याचे बोलले जात आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे, रवींद्र चव्हाण यांच्यासह अनेक नेत्यांनी जिल्ह्याचा दौरा करीत स्थानिक नेत्यांमध्ये खदखद असतानाही चांगले यश मिळवले आहे हे विशेष. शिवसेनेने पालघरमधील ८ जागांवर २ जागांची भर घालीत एकूण १० उमेदवार निवडून आणले आहे, तर वसई १, डहाणू ३, विक्र मगड १, जव्हार १, वाडा २ तर वसई १ अशा एकूण १८ जागा सेनेच्या पदरात पडल्या आहेत. त्याच वेळी तलासरी, मोखाडा या दोन गटात त्यांना यश मिळालेले नाही.
राष्ट्रवादी काँग्रेसने मारलेली झेप आश्चर्यकारक ठरली आहे. कॅबिनेट मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनील भुसारा यांच्यासह अनेक नेत्यांनी गड लढवीत मागील वेळी असलेल्या ४ जागांवरून थेट १५ जागांवर उसळी घेतली आहे. विक्रमगड, वाडा आणि जव्हार तालुक्यात जिजाऊ संस्थेचे नीलेश सांबरे आणि आमदार सुनील भुसारा यांनी लावलेल्या ताकदीच्या जोरावर राष्ट्रवादीला हे यश मिळाले आहे.
>राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यानंतर झालेल्या पहिल्याच जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत पालघर जि.प.त सत्ताधारी भाजपसह बविआलाही मोठा फटका बसला आहे. भाजपने २०१५ मध्ये २१ जागी विजय मिळवला होता, मात्र या वेळी त्यांना ११ जागांचे नुकसान झाले असून केवळ १० जागांवरच समाधान मानावे लागले आहे. अंतर्गत नाराजीचा भाजपला फटका बसला.तीन आमदार असलेल्या बविआलाही आपल्या १० जागा राखता येणे शक्य झालेले नाही. त्यांना ६ जागांचा फटका बसत अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागले आहे. यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या यशाबरोबरच भाजप आणि बविआला झालेल्या नुकसानीचीही चर्चा जिल्ह्यात होऊ लागली आहे. बविआचा बालेकिल्ला असलेल्या वसई तालुक्यातच त्यांची कामगिरी निराशाजनक झाली. पालघर जिल्ह्याच्या काही भागात मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने अद्यापही आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. या वेळी त्यांनी आपल्या ४ जागांमध्ये २ जागांची वाढ करीत ६ जागा जिंकल्या आहेत. तलासरीमधील दोन अधिक जागा माकपने जिंकत भाजपला धूळ चारली. या वेळी अपक्षांच्या संख्येत वाढ होत ३ जागा तर काँग्रेसने आपली एक जागा राखण्यात यश मिळविले.