मीरारोड - ठाणे लोकसभा मतदारसंघा वरून भाजपा आणि शिवसेना शिंदे गटाचा तिढा अजून सुटला नसला तरी भाजपचे इच्छूक उमेदवार संजीव नाईक यांनी मात्र जागावाटपाआधीच आपला उमेदवार म्हणून प्रचार मात्र सुरूच ठेवला आहे. त्यामुळे ठाणे लोकसभा मतदारसंघ प्रतिष्ठेच्या केलेल्या शिवसेना शिंदे गटा वर शिवसेना ठाकरे गटाने टीकेचे बाण चालवण्यास सुरवात केली आहे .
ठाणे लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असताना यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपा सोबत युती करून उलट हा बालेकिल्ला राखण्यासाठी शिंदे गटाला झगडावे लागत आहे. दुसरीकडे भाजपचे माजी खासदार संजीव नाईक यांनी तर जाहीरपणे पक्षाने आपल्याला उमेदवारीसाठी हिरवा कंदील दिल्याचे सांगत प्रचारास सुरवात करत असल्याचे भाईंदरच्या बालाजी नगर येथे काही दिवसांपूर्वी म्हटले होते. इतकेच काय तर आपले चिन्ह धनुष्यबाण सुद्धा असू शकते पण आपल्याला कमळावरच लढायचे आहे असे देखील नाईक यांनी स्पष्ट केले होते.
'लोकमत'ने सर्वात प्रथम याबाबतचे वृत्त दिल्यानंतर शिवसेना शिंदे गटात चलबिचल सुरु झाली. ठाणे हा बाळासाहबे ठाकरे आणि आनंद दिघे यांचा गड असताना आणि शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठाण्याचे असताना भाजपाला मतदार संघ सोडणे वा नाईक याना सेनेत घेऊन निवडणुकीला उभे करणे म्हणजे बालेकिल्ल्यातच शिवसेना शिंदे गटाला नामुष्की ठरण्याची भीती अनेक शिवसैनिकांनी बोलून दाखवली होती .
परंतु ठाणे कोणाच्या वाट्याला येईल वा उमेदवार अधिकृत जाहीर झाला नसला तरी संजीव नाईक यांनी मोठ्या आत्मविश्वासाने आपली उमेदवारी ९९ टक्के पक्की असल्याचे सांगत प्रचाराला सुरवात केली. त्यातही मीरा भाईंदर मध्ये नाईक यांचे समर्थक आणि माजी आमदार नरेंद्र मेहता समर्थक हे नाईक यांच्या सोबत शहरात फिरताना दिसत आहेत. मेहता यांनी तर आधीच शिवसेना शिंदे गटाच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही अशी भूमिका जाहीरपणे मांडली असल्याने नाईक यांना मेहता गटाचे समर्थन मिळत असल्याचे चित्र आहे.
नाईक यांनी भाजपातील माजी नगरसेवकांच्या तसेच प्रमुख लोकांच्या घरोघरी जाऊन भेटी गाठी चालवल्या आहेत. निवासी संकुलातील प्रमुख लोक, समाजातील प्रमुख मंडळी आदींच्या भेटी नाईक घेत त्यांना निवडणुकीत पाठिंबा देण्याचे आवाहन करत आहेत . तर शिंदे सेने कडून अजूनही अधिकृत उमेदवार नक्की झाला नसला तरी इच्छुक उमेदवार मानले जाणारे आमदार प्रताप सरनाईक वगळता माजी आमदार रवींद फाटक आणि माजी महापौर नरेश म्हस्के मात्र मीरा भाईंदर मध्ये लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अजूनही सक्रिय झालेले दिसत नाहीत.
ठाकरे गटाचे भाईंदर शहरप्रमुख जितेंद्र पाठक यांनी शिवसेना शिंदे गटा कडे खासदार राजन विचारे यांच्या समोर लढण्यासाठी उमेदवारच नसल्याने त्यांना भाजपाला जागा सोडण्या शिवाय पर्याय राहिलेला नाही. नाईक यांनी उघडपणे सुरु केलेला प्रचार हे शिंदे गटाची नामुष्की आहे.
मीरा भाईंदर शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हा प्रमुख लक्ष्मण जंगम यांनी, शिंदे गटात गेलेल्याची अवस्था बिकट असून ठाण्याचा गड म्हणवणाऱ्यां शिंदे गटाला भाजपा जागा सोडत नाही. मग येणाऱ्या विधानसभा आणि पालिका निवडणुकीत त्यांची किती बिकट अवस्था होऊ शकेल याची कल्पना न केलेली बरी असा टोला लगावला आहे.