मनोर : न्यायालयाच्या आदेशाने हाय वे व इतर ठिकाणचे सरकार मान्य देशी विदेशी दारूची दुकाने व बीयर बार बंद करण्यात संबंधित विभाग यशस्वी झाल्याने हातभट्टी जोरात सुरू झाली असून तिच्यासाठी लागणाऱ्या काळ्या गुळाला गाव खेडे पाड्यात उधाण आले आहे. तरी संबंधित विभाग मात्र मूग गिळून गप्प आहेत. ग्रामीण भागातील आदिवासी व इतर समाजातील तरूण व वयोवृध्द दारूच्या नशेत बुडाले होते. त्यामध्ये चालक व मोल मजुरी करणारे यांचा सहभाग मोठा होता. त्यामुळे घरी पोहचे पर्यंत सर्व पैसे बीयर बार, देशी दारू दुकान, वाइन शॉप मध्ये संपवून ते रिकाम्या हाताने घरी यायचे त्यामुळे त्यांचे मुल बाळं पूर्ण कुटुंब उपाशी रहात होते, अशी स्थिती पालघर पूर्व मधील जंगलपट्टीत निर्माण झाली होती. आता जेव्हापासून दारूची दुकाने,बीयर बार बंद झाले तेव्हापासून त्यांच्या कुटुंबाला सुखाचे दिवस येण्याची चाहुल लागली होती. परंतु या परीसरात इतके दिवस बंद असलेल्या हातभट्ट्या पुन्हा धडाडून पेटल्या आहेत. गावठी निर्मितीसाठी लागणारा काळा गूळ बंदी असतांनाही गुजरातमधून भरभरून येतो आहे. त्यामुळे देशीविदेशी गेली आणि गावठी फोफावली अशी स्थिती आहे.गाव खेडे पाड्यात काळ्या गुळाच्या दारूला सुगीचे दिवस आले असून ज्या घरांना दारू तयार केली जाते तिथे सध्या तळीरामांची झुंबड उडते. जे दुकानदार काळ्या गुळची विक्र ी करतात त्यांचे दुकान सील करावे ज्या गाव पाडयात घरगुती दारू तयार केली जाते अशा ठिकाणी छापे टाकून त्यांच्यावर कारवाई करावे अशी मागणी नागरीकांकडून केली जात आहे गावठी दारू व काळा गुळ विक्री वर बंदी आणली तर अजून फरक पडेल तसेच लग्न, हळद, साखरपुडयातही दारूचे प्रमाण घटले आहे. कुठे हि दारू दिसत नाही. त्यामुळे लग्नही सुखरूप पार पडत आहेत त्यांचे पैसेही वाचत आहेत. (वार्ताहर)
हातभट्टीसाठी गावपाड्यात काळ्या गुळाला उधाण
By admin | Published: April 26, 2017 12:02 AM