हितेन नाईक पालघर : जव्हारमधील गरीब आदिवासी दिव्यांगांची शाळा अचानक बंद पडते आणि सर्व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य संकटात सापडते. त्यांच्या पालकांपुढे निर्माण झालेल्या मोठ्या संकटाची माहिती शिक्षकामार्फत जिजाऊ संस्थेचे अध्यक्ष नीलेश सांबरे यांच्यापुढे मांडल्यानंतर अवघ्या २० दिवसांत या दिव्यांगांसाठी झडपोलीमध्ये ओमकार अंध-अपंग व गतिमंद मुलांची निवासी शाळा आकार घेते. आज शाळेतील ६५ विद्यार्थ्यांचे पालकत्व सांबरे यांनी स्वीकारले असून यात ३२ मुले आणि ३३ मुलींचा समावेश आहे. जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या धगधगीत मुशीतून तयार झालेल्या चार विद्यार्थिनी जळगाव येथे यूपीएससी स्पर्धा परीक्षांची जोरदार तयारी करीत आहेत.समस्यांनी घेरलेल्या विक्रमगड तालुक्यातील झडपोली येथील एका छोट्याशा गावातील एसटी कंडक्टर भगवान सांबरे आणि भावनादेवी यांच्यापोटी जन्मलेले नीलेश सांबरे हे रत्न. अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी रस्ते उभारणीच्या क्षेत्रात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली. मनोर-वाडा-भिवंडी येथील टोलनाक्यावरील २०१३ च्या आंदोलनानंतर झालेल्या तुरुंगवासात त्यांना जीवनाचा खरा अर्थ समजला आणि जिजाऊ शैक्षणिक, सामाजिक संस्थेची स्थापना होत सामाजिक कार्याच्या झंझावातातून नीलेश सांबरे हे नाव आज ठाणे, पालघर, कोकणवासीयांच्या तोंडी आहे. स्वकमाईतून सर्वसामान्यांचे दु:ख दूर करण्यासाठी विनामूल्य रुग्णालय, शाळा-महाविद्यालय, स्पर्धा परीक्षा केंद्र, दिव्यांगांची शाळा आदी सामाजिक कर्तव्याची व्यवस्था उभी करणारा हा अवलिया आहे तरी कोण? याची चर्चा पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गसारख्या कोकण प्रांतात होऊ लागली आहे. कोरोनाच्या संकटकाळातही त्यांनी हे व्रत नेटाने सुरू ठेवले आहे.
पालघरमधील अंध, अपंग, गतिमंद मुलांना मिळाला ‘जिजाऊ’चा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2020 12:52 AM