वाडा : वाडा शहरातील अनेक वर्षांपासून खोळंबलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामाला गेल्या सोमवारपासून सुरूवात झाली आहे. मात्र या कामात महावितरणच्या विद्युत खांबांचा अडथळा येतो आहे. त्यामुळे हे काम सुरू होत नाही, तोवर बंद पडते की काय, अशी चर्चा नागरिकांमध्ये आहे.
वाडा-देवगांव-नाशिक हा राज्य महामार्ग वाडा शहरातील मुख्य बाजारपेठेतून जातो. अनेक वर्षे या रस्त्याचे रुंदीकरण झालेले नाही. वाडा बाजापेठेतून जाणाऱ्या या रस्त्याच्या दोन्ही बाजूस येथील व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण केल्याने हा रस्ता खूपच अरुंद झाला आहे. या रस्त्यावर नेहेमीच होणाºया वाहतूक कोंडीचा त्रास वाहन चालकांना तर होतोच, पण येथून जाणाºया पादचाºयांनाही होतो आहे. येथील वाहतूक कोंडीमुळे एक किमी.चे अंतर कापण्यास वाहनांना नेहमीच अर्धा ते पाऊण तास लागत असल्याने या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी दोन वर्षांपासून होत होती.
सोमवार, १५ जुलैपासून वाडा शहरातील कैलास सिनेमा गृहापासून या रस्त्याच्या गटार बांधण्यासाठी खोदकामास सुरुवात झाली हो. जेसीबीद्वारे खोदकाम करीत असताना ठिकठिकाणी उभे असलेले महावितरणचे विद्युत पोल अडचणीचे ठरत आहेत. आड येणारे बहुतांशी खांब हे उच्च दाबाचे असून त्यातून विद्युत प्रवाह सुरु आहे. त्यामुळे या खांबांमुळे धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. इतक्या दिवसांनी सुरू झालेले हे काम पुन्हा रखडणार की काय अशी चर्चा सुरु झाली आहे.
दोन्ही खात्यांमध्ये समन्वय नाहीवाडा शहर बाजारपेठेतील रस्ता रु ंदीकरणाचा विषय दोन वर्षांपासून गाजत आहे. या दोन वर्षात विद्युत खांब संबंधित विभागांनी का हटविले नाहीत. पोल हटविण्यासाठी महावितरण कंपनी व सार्वजनिक बांधकाम विभाग या दोन्ही खात्यांमध्ये समन्वय नसल्यामुळेच रखडले गेल्याचे बोलले जात आहे.
वाडा शहर बाजारपेठ रस्त्यालगत असलेले विद्युत खांब हटवून ते नवीन जागेत उभे करण्यासाठी येणाºया खर्चाचे अंदाजपत्रक विभागीय कार्यालयाकडे पाठविले आहे. ते मंजूर करून त्याची रक्कम भरण्याचे काम सा.बां. विभागाचे आहे. - ज्ञानेश्वर वट्टमवार, विभागीय अभियंता, वाडा.
विद्युत वितरण कंपनीकडून मिळालेल्या अंदाजपत्रकाचे पैसे भरण्याचे काम येत्या काही दिवसात पूर्ण होईल. - चंद्रकांत पाटील,उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाडा.