बोर्डी : घोलवड गावातील रस्ता खचल्याने अवजड वाहतुकीसह एस.टी सेवा बंद असून बोर्डी येथे शाळा महाविद्यालयात जाणाऱ्या शेकडो विद्यार्थ्यांना रोज चार कि. मी. पायपीट करावी लागते. पर्यायी मार्गावर एस.टी बस चालविण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी आणि पालकांनी डहाणू बस आगार व्यवस्थापकाकडे केली आहे. मात्र, तांत्रिक सबब पुढे करून बस आगाराने हतबलता दर्शविली आहे.बोर्डी येथील आचार्य भिसे विद्यानगरीत सुपेह विद्यालय, नॅशनल इंग्लिश स्कुल, पी. जी. कनिष्ठ महाविद्यालय, एन. बी. मेहता आणि कटघरा पॉलिटेक्निक महाविद्यालय आहे. या शाळा महाविद्यालयात डहाणूतून शेकडो विद्यार्थी चिखलेमार्गे बोर्डी असा एस.टीने प्रवास करतात. दहा दिवसांपूर्वी डहाणू-बोर्डी आगार मार्गावर घोलवड गावातील मोरीचा भाग खचून रस्त्याला भगदाड पडल्याने अवजड वाहनासह एस.टीची सेवा बंद आहे. डहाणूहून घोलवड प्राथमिक केंद्रापर्यंत बस सेवा आहे. पुढील दोन कि. मी. शाळेपर्यंत आणि माघारी येताना असे चार कि. मी. अंतर विद्यार्थ्यांना पायी कापावे लागते. वर्गात उशीरा पोहचल्याने शैक्षणिक नुकसान होते. शिवाय थकल्यामुळे विद्यार्थी घरी अभ्यास करीत नाहीत. अनेक मुले या त्रासामुळे आजारी पडल्याचे पालकांचे म्हणणे आहे.याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर डहाणू बस आगारातर्फे पर्यायी मार्गाचा वापर करून मिडी बस सुरू करण्याबाबत सकारात्मकता दाखविली होती. मात्र तांत्रिक बाबी पूर्ण करण्यासाठी आठवड्यापेक्षा अधिक अवधी लागू शकतो असे आगार व्यवस्थापक एम. एम. बेहेरे यांनी सांगितले. २६ जुन २००२ साली नरपड खाडीपुलानजीकची फरशी पुरामुळे वाहुन गेल्याने हा मार्ग बंद झाला होता. तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांनी भेट दिल्यानंतर युद्धपातळीवर रस्त्याचे काम पूर्ण झाले होते. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या अनास्थेमुळे विद्यार्थी, बागायतदार व नागरीकांना असुविधा होत असल्याचा संताप स्थानिकांमध्ये खदखदत आहे. (वार्ताहर)
बोर्डीत विद्यार्थ्यांची पायपीट
By admin | Published: December 02, 2015 12:13 AM