लोकमत न्यूज नेटवर्क, नालासोपारा (मंगेश कराळे) :- विरारच्या अर्नाळा किल्ल्यातील घराच्या दुरुस्तीसाठी खडी व विटा वाहून नेणारी बोट उलटली असल्याची घटना रविवारी संध्याकाळी अर्नाळा समुद्रात घडली आहे. या बोटीत एकूण १२ मजूर होत. त्यातील ११ जण सुरक्षित असून एका मजुराचा मृत्यु झाला आहे. संतोष मुकने असे या दुर्घटनेत मयत झालेल्या मजुराचे नाव आहे.
पावसाळ्यापूर्वी अर्नाळा किल्ल्यातील घरांच्या दुरुस्तीची कामे करण्यात येत असल्याने या बोटीतून विटा व रेती नेली जात होती. मात्र या बोटीच्या पंख्यात नांगरलेल्या बोटीचा दोर अडकल्याने वेगात असताना ही बोट समुद्रातच कलंडली आहे. पाठीमागून येणाऱ्या एका बोटीमुळे ११ मजूर सुखरूप होऊन किनाऱ्यावर पोहोचले. मात्र एका मजुराचा या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचा मृतदेह उशिरापर्यंत सापडला नाही. अर्नाळा पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांकडून कोस्ट गार्डचे हेलिकॉप्टर व खाजगी बोटी मार्फत बेपत्ता इसमाचा शोध घेतला जात होता अखेर २४ तासांनी त्याचा मृतदेह शोधण्यात यश आल्याची माहिती अर्नाळा पोलिसांनी दिली.
विरारला अर्नाळा व अर्नाळा किल्ला परिसर आहे. या भागात वाळू उपसा करण्यासाठी बंदी असताना सुद्धा छुप्या मार्गाने वाळू उपसा करण्याचे प्रकार सुरूच आहेत.