डोंबिवली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेनुसार स्वच्छ भारत अभियानांतर्गत केडीएमसीचे नवनिर्वाचित आयुक्त ई. रवींद्रन यांनी स्वत: हाती झाडू घेऊन शनिवारी सकाळी कल्याणच्या दुर्गामाता चौकातून स्वच्छता अभियानाचा प्रारंभ केला. रस्त्यांची दुरुस्ती, नालेसफाई, पाणीपुरवठा, विद्युत व्यवस्था, भुयारी गटारे, उद्यानांच्या स्वच्छतेसाठी ही मोहीम राबविण्यात आली. त्या वेळी आयुक्तांसमवेत एमएसआरडीसीचे कार्यकारी अभियंता दत्तात्रेय भोंडे, घनकचरा विभाग व्यवस्थापन उपायुक्त सु.रा. पवार, दीपक पाटील, सुनील लहाने, सहायक आयुक्त संजय शिंदे, शहर अभियंता पी. उगले, कार्यकारी अभियंता रवी जौरस, रवींद्र पुराणिक, चंद्रकांत कोलते, दीपक भोसले, सभागृह नेते कैलास शिंदेंसह अन्य लोकप्रतिनिधी असे सुमारे १५० कर्मचारी होते. त्या वेळी आयुक्तांनी रस्त्यावरील डेब्रिज उचलणे, वॉटर स्पॉट क्लिअर करणे, खड्डे भरणे, डिव्हायडरमध्ये असलेली गॅप बंद करणे आदी सूचना त्यांनी अभियंत्यांसह अन्य संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. पाणीपुरवठा विभागाने दोन ठिकाणचे लिकेज काढले तर विद्युत विभागाने पथदिव्यांची तपासणी केली. उद्यान विभागाने विविध भागांतील वाढलेले गवत कापले. बांधकाम विभागाने वाहतूक बेट स्वच्छ केले, तर जेथे कचराकुंड्या होत्या, त्यातील कचरा उचलण्याचे काम झाल्यावर तेथे जंतुनाशक पावडर फवारणी, दुर्गंधीनाशक फवारा मारून स्वच्छता करण्यात आली. (प्रतिनिधी)
आयुक्तांंच्या हाती झाडू
By admin | Published: August 03, 2015 3:37 AM