शशी करपे । लोकमत न्यूज नेटवर्कवसई : वीस लाख लोकसंख्या असलेल्या वसई विरार महापालिकेकडे स्वत:चे शवविच्छेदन गृह आणि शवागर नाही. शहरात दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. सध्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन केले जात आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीक आणि पोलिसांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. सध्या शवविच्छेदनाची व्यवस्था महापालिका हद्दीतील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आलेली आहे. शवविच्छेदनाची सरासरी आकडेवारी पाहता वसई विरार महापालिका हद्दीत दिवसाला किमान पाच मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. नवघर प्राथमिक आरोग्य केंद्र आणि विरार येथील ग्रामीण रुग्णालयात मिळून वर्षाला आठशेच्या आसपास शवविच्छेदन केले जातात. त्याखालोखाल नालासोपारा प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण तीनशे, आगाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७०, कामण प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला सरासरी १०० आणि भाताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात वर्षाला साधारण ७० मृतदेह शवविच्छेदनासाठी येतात. असे असतानाही निर्मिती होऊन सात वर्षे उलटली तरी महापालिकेला स्वत:चे शवविच्छेदन केंद्र सुरु करता आलेले नाही. काही प्राथमिक केंद्रात महापालिकेने निधी खर्च करून शवविच्छेदनाची सोय केली आहे. मात्र, इतक्या मोठ्या प्रमाणात शवविच्छेदन होत असल्याने ही सुविधा अपुरी पडत आहे.जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये शवविच्छेदन असले तरी अनेक ठिकाणी शवविच्छेदक नाहीत. नवघर आणि नालासोपारा येथे तर तीन महिला स्विपर आहेत. त्यांच्याकडून शवविच्छेदन करता येत नाही. दुसरीकडे, महापालिका स्वत:चे शवागरही अद्याप बांधू शकलेले नाही. नातेवाईक अथवा इतर अडचणींमुळे तसेच बेबारस मृतदेहांना शवागृहात ठेवावे लागते. महापालिकेने नवघर येथे चार मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केलेली आहे. तसेच सोपारा आणि वसई रुग्णालयात काही मृतदेह ठेवण्याची व्यवस्था केली आहे. पण, ती अपुरी पडत असल्याने नागरीकांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. महापालिकेने अत्याधुनिक शवविच्छेदनगृ आणि शवागर बांधण्यासाठी दीड कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यासाठी पाचूबंदर येथील जागाही निवडण्यात आलेली आहे. मात्र, सदर जागा सीआरझेडच्या कचाट्यात सापडल्याने शवागर आणि शवविच्छेदन गृह बांधण्याचे काम रखडून पडले आहे. शवविच्छेदन गृह आणि शवागर शहरापासून दूर असणे गरजेचे आहे. मात्र, तशी जागा मिळत नसल्याने मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
वसई-विरार महापालिकेचे शवविच्छेदनगृह, शवागार नाही
By admin | Published: June 10, 2017 1:02 AM